Tue, Sep 22, 2020 00:02होमपेज › National › अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज 'या' राज्यांतील शाळा-कॉलेज बंद

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज 'या' राज्यांतील शाळा-कॉलेज बंद

Last Updated: Nov 09 2019 10:18AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

सर्वोच्च न्यायालय आज (दि ९) अयोध्या वादग्रस्त जमिनीप्रकरणी सकाळी १०.३० ला निकाल देणार आहे. जवळपास दोन दशकानंतर या वादग्रस्त विषयावर न्यायालयीन अंतिम निकाल येणार आहे. हा विवाद संवेदनशील असल्याने प्रशासनाने उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू आणि कर्नाटक मधील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील शाळा आणि कॉलेज आजपासून मंगळवार पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील देखील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात येत आहेत.

देशातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाण्याऱ्या अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज अंतिम निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय देशभरातील राज्यात शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता आणि सद्भाव कायम राखावा आवाहन केले. 'राज्य सरकाल राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कटीबद्ध आहे. जे कोण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करेल त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.' असे उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती दिली. तसेच खासगी शाळांनाही सुट्टी देण्याचे आवाहन केले.

हे प्रकरण अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन प्रकरण आहे. ही जमीन म्हणजे प्रभु रामचंद्र यांची जन्मभूमी असल्याचा दावा केला गेला. त्यानंतर या जमिनीवर असलेली १६ व्या शतकातील मशीद जी मुघल शासक बाबरने बांधली होती. ही मशीद १९९२ ला उजव्या विचारसरणीच्या कट्टरपंथियांनी पाडली होती. त्यानंतर देशभर झालेल्या दंगलीत जवळपास २ हजार लोकांना आपले प्राण गमवावा लागला होता. 

या प्रकरणी २०१० ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल देताना या विवादीत जमिनीची विभागणी तीन भागात करत सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांना मालकी हक्क दिला होता. या निकालाविरोधात १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. आज या सुनावणीचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. 
 

 "