Sat, Jan 23, 2021 06:53होमपेज › National › कर्नाटक, गोव्यातील राजकीय भूकंपानंतर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस सतर्क

कर्नाटक, गोव्यातील राजकीय भूकंपानंतर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस सतर्क

Published On: Jul 12 2019 10:32AM | Last Updated: Jul 12 2019 10:32AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकसह गोव्यात काही आमदार फुटल्याने काँग्रेसकडून त्यांचे आता दुसरे किल्ले वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. या दोन्ही राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काँग्रेस नेतृत्व सतर्क झाले आहे. विशेषतः मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काँग्रेस नेतृत्व त्यांना समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांकडे लक्ष ठेवून आहे. या दोन्ही राज्यांत काँग्रेस खूप कमी अंतराने बहुमताचे सरकार चालवत आहे. ही दोन्ही राज्य सरकारचे भवितव्य अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर अवलंबून आहे.

भाजपचे आता मध्य प्रदेशाकडे लक्ष आहे, याची कल्पना काँग्रेसला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि अन्य नेते आपल्या आमदारांच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे समजते.

कमलनाथ सरकारचे भवितव्य समाजवादी, बीएसपी आणि अन्य काही अपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. राजस्थानमध्येही अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री रहावेत, या अटीवर काँग्रेस सरकारला सुमारे एक डझन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. आतापर्यंत येथील नेतृत्व पक्षाला एकजूट ठेवण्यात यशस्वी झाले. मात्र, पुढील काही दिवसांत त्यांना आव्हान निर्माण होऊ शकते, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

मध्य प्रदेशातील राजकीय बलाबल

मध्य प्रदेशात २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११४ तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. २३० सदस्यीय विधानसभेत सरकार बनविण्यासाठी ११६ हा बहुमताचा जादुई आकडा आहे. यामुळे काँग्रेसने एसपी १, बीएसपीचे २ आणि ४ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले.

राजस्थानमधील स्थिती

राजस्थानमध्ये काँग्रेसकडे १००, भाजपकडे ७३ संख्याबळ आहे. येथे बीएसपीने ६ जागा जिंकल्या होत्या. येथील २०० सदस्यीय विधानसभेत सरकार बनविण्यासाठीचा जादुई आकडा १०१ आहे. येथे काँग्रेसने सुमारे एक डझन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार बनविले.