Mon, Aug 03, 2020 15:12होमपेज › National › ‘आज के शिवाजी’ पुस्तकाचे पुनर्लेखन करणार : गोयल

‘आज के शिवाजी’ पुस्तकाचे पुनर्लेखन करणार : गोयल

Last Updated: Jan 15 2020 1:07AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे आपण पुनर्लेखन करणार असल्याचे पुस्तकाचे लेखक आणि भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने त्याबाबतचे वृत्त दिले आहे. 

गोयल म्हणाले की, शिवसेनेने सत्तेसाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले आणि सत्तेसाठीच त्यांनी काँगे्रसशी हातमिळवणीही केली. त्यांनी काहीही केले तरी चालते. मी माझ्या पुस्तकात छत्रपतींचे गुणगान गायले आहे. तरीही त्यावर आक्षेप घेतला जातो. शिवाजी महाराजांचे वंशज खा. उदयनराजे यांनीच शिवसेनेच्या स्वार्थी राजकारणावर भाष्य केले आहे. त्यावर मला अधिक बोलण्याची गरज नाही. शिवसेनेने आता आपल्या पक्षाचे नाव बदलून सोनिया सेना असे ठेवावे. 

माझ्या पुस्तकावरून देशभरातून वादंग माजला आहे. त्यामुळे मी या पुस्तकाचे पुनर्लेखन तर करणार आहेच; पण माझे मूळ पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाचायला देणार आहे. त्यांनीच ठरवावे की ते आक्षेपार्ह आहे की कसे ते, असे गोयल यांनी सांगितले. 

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकाशी भाजपचा काहीच संबंध नाही. ते प्रकाशनही भाजपचे नाही. गोयल यांनी वैयक्‍तिकरीत्या ते प्रकाशित केले आहे. तरीही जनतेच्या भावना  विचारात घेऊन आम्ही त्यांना हे पुस्तक मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केली आहे, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी रात्री सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी गोयल यांनी आपण या पुस्तकाचे पुनर्लेखन करणार असल्याचे सांगितले.