पुढारी ऑनलाईन डेस्क
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रमध्ये कोरोना विषाणुचं 'डबल म्युटेशन' आढळून आलं आहे.महाराष्ट्रातून जीनोम सिक्वेंसिंगसाठी जे नमुने गोळा करण्यात आले होते. हे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलाॅजी आणि नॅशनल सेंटर फाॅर सेल सायन्सेस या संस्थांकडे पाठविले होते. त्यामध्ये E484Q आणि L452R अशी दोन म्युटेशन आढळून आलेली आहेत. तर, महत्वाची बाब अशी आहे की, आता कोरोना विषाणुचं म्युटेशन होतं कसं? यासंदर्भात सविस्तर माहिती पाहू...
म्युटेशन म्हणजे काय?
कोरोना विषाणुंच्या रचनेच थोडासा बदल होणं म्हणजे म्युटेशम होय. जेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पसरत जातो, तेव्हा मूळच्या कोरोना विषाणुमध्ये हा बदल म्हणजेच म्युटेशन होतो. सहाजिक मूळचा कोरोना विषाणू बदलल्यामुळे नवीन कोरोना विषाणू तयार झालेला असतो. त्यालाच नवीन स्ट्रेन्स म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मतानुसार संसर्गकाळात विषाणुंमध्ये म्युटेशन होतच असतं. यामध्ये समाधानाची बाब अशी आहे की, कोरोनावरील सध्याच्या लसी या नव्या कोरोना स्ट्रेन्सवर प्रभावी ठरताहेत.
म्युटेशन होतं कसं?
एका पेशीतून दुसऱ्या पेशीत किंवा एक शरीरातून दुसऱ्या शरीरात कोरोनाचा विषाणू जातो तेव्हा त्याच्या मूळच्या संरचनेत बदल होत जातो. त्यातून विषाणुचं वर्तन बदलत जातं. त्यालाच व्हेरिएंट्स म्हणतात. या एकूण प्रकाराला म्युटेशन असं म्हणतात. आतापर्यंत कोरोनाच्या मूळच्या विषाणुमध्ये १७ महत्वाचे बदल झालेले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा बदल त्याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये झालेला आहे. हे स्पाईक प्रोटीन म्हणजे मानवी पेशींमध्ये विषाणुंना सहज प्रवेश करता येईल असा महत्वाचा घटक होय. या स्पाईक प्रोटीनमुळे मागील वर्षाच्या तुलनेत कोरोना विषाणुंचा प्रसार दुपटीने वाढल्याचे समोर आलेले आहे. एकंदरीत काय, तर कोरोना विषाणुंच्या नव्या स्ट्रेन्सचा वेग हा मोठा आहे.
डबल म्युटेशन म्हणजे नक्की काय?
१) E484Q : जीनोम सिक्वेन्सिंगसाठी जे काही नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दोन प्रकाराचे म्युटेशन सापडले. त्यातील E484Q हा एक एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनद्वारे शरीरात प्रवेश केलेल्या या नव्या स्ट्रेन्सला शरीरातील एण्टीबाॅडीज जास्त ओळखत नाहीत. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हा नवा म्युटेशन सापडला. तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मते, हा नवा म्युटेशन तीव्र वेगात पसरतो. त्याचं वर्तन वेगळं आहे. माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती या नव्या म्युटेशनला ओळखत नसल्याने करोनाच्या संसर्गाची क्षमता जास्त आहे.
२) L452R : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पहिल्यांदा हे नवे म्युटेशन सापडले. त्यानंतर हे म्युटेशन जगात वेगाने पसरलं. हे म्युटेशन फास्ट स्प्रेडिंग म्हणजेच अतितीव्र वेगानं पसरणारं म्युटेशन आहे. महाराष्ट्रात ११८ कोरोना रुग्णांमध्ये L452R म्युटेशन सापडलेलं आहे.
केंद्रीय आरोग्याच्या म्हणण्यानुसार या डबल म्युटेशनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली नसली तरी, शास्त्रज्ञांच्या आणि डाॅक्टरांच्या मतानुसार कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामध्ये डबल म्युटेशनचा देखील संबंध असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. अमरावती, विदर्भ आणि नागपुरमध्ये कोरोना बाधितांमध्ये हे नवे म्युटेशन सापडलेले आहेत. त्यामुळे राज्यातील डाॅक्टरांच्या आणि तज्ज्ञांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. असं असलं तरी कोरोना नवा म्युटेशन किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.