Mon, Aug 10, 2020 08:14होमपेज › National › विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापण्याचा विचार

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापण्याचा विचार

Last Updated: Jul 14 2020 6:24PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील कुख्यात गुंड विकास दुबे व त्याच्या साथीदारांचे पोलिसांनी केलेले एन्काऊंटर तसेच दुबे टोळीने केलेल्या हल्ल्यात झालेल्या आठ पोलिसांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ शाखेने विकास दुबे याचे एन्काऊंटर केले होते. 

विकास दुबे तसेच त्याच्या अन्य साथीदारांच्या एन्काऊंटर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी केली जावी, अशा विनंतीच्या याचिका दाखल झाल्या आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिका दाखल करून घेत एन्काऊंटर संदर्भातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले. 

विकास दुबे व त्याच्या साथीदारांचे तसेच आठ पोलिसांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाऊ शकते, अशी टिप्पणी खंडपीठाने यावेळी केली. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी २० तारखेला होणार आहे.