नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
अनलॉक-२ संबधी केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केली. ३१ जुलैपर्यंत देशातील सिनेमागृहे, महाविद्यालये, शाळा, प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय उड्डाण, मेट्रो, व्यायामशाळा, जलतरण तलाव, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्वीप्रमाणेच बंदी राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत देशातील नियंत्रण क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) लॉकडाऊन कायम राहील, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कंटेनमेंट झोनबाहेरील केंद्र व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्थांना १५ जुलैपासून काम करण्याची परवानगी देण्यात येईल. लवकरच यासंबंधी मानक कार्यप्रणाली (एसओपी) कार्मिक व प्रशिक्षण विभागाकडून जारी केली जाईल. कोरोना संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या रात्र संचार बंदीत शिथिलता देण्यात आली असून आता रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत विनाकारण घरा बाहेर पडण्यास नागरिकांनी मनाई करण्यात आली आहे.
नियंत्रण क्षेत्र वगळता उर्वरित भागातील मॉल्स, हॉटेल्स, रेस्टोरंट, हॉस्पिलिटी सर्व्हिस ८ जूनपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधी लवकरच मानक कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात येईल.
आंतरराज्य तसेच राज्याअंतर्गत मालवाहतुकीवर कसलीही बंदी घालण्यात आली नसल्याचे केंद्राकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. माल वाहतुकीसाठी कसलीही परवानगी, ई-पासची आवश्यकता राहणार नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.
केंद्राच्या मार्गदर्शन सूचना येण्यापूर्वीच महाराष्ट्रात अनलॉडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढण्यात आला आहे, हे विशेष. केंद्राच्या निर्देशांनुसार नियंत्रण क्षेत्रात केवळ जीवनावश्यक सेवाच सुरू ठेवता येतील. नियंत्रण क्षेत्रासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणेच स्थानिक प्रशासन तसेच राज्य सरकारकडे देण्यात आले आहेत. नियंत्रण क्षेत्रात नागरिकांची घरोघरी जाऊन वैद्यकीय चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढण्याचे निर्देशही केंद्राकडून देण्यात आले आहेत. नियंत्रण क्षेत्रासह बफर झोनची ओळख करून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.