Sat, Apr 10, 2021 19:26
लसीबाबत संभ्रम पसरवणे मूर्खपणाचे; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्य सरकारला झापले

Last Updated: Apr 08 2021 8:03AM

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारने जर लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात केला नाही तर पुढील दोन दिवसांत लसीकरण बंद पडेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सलग ट्विट करून महाराष्ट्र सरकारला झापले आहे. ‘कोरोना लसीबाबत संभ्रम निर्माण करणे हे मूर्खपणाचे आहे, महाराष्ट्रात लसीकरणाचे वेग कमी असून सरकाला आपल्या जबाबदारीचे भान का नाही? ‘असा सवालही त्यांनी विचारला आहे.

वाचा : ९ वी, ११ वीच्याही परीक्षा रद्द; ३१ लाख विद्यार्थी थेट पास!

बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात लशींची तुटवडा असल्याचे सांगितले. ‘राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा आहे. तीन दिवसांत लस मिळाली नाही तर लसीकरण बंद पडेल.’ असे सांगितले. 

सध्या महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला आहे. राज्यात सद्यस्थितीत ४ लाख ७० हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. देशातील १० हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी सात जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे सर्वाधिक संसर्गित राज्य आहे. एकीकडे महाराष्ट्राला सर्वाधिक लशीची गरज असताना गुजरात आणि राजस्थान या राज्यांना लशींचा पुरवठा केला जात असल्याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. राजेश टोपे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केवळ वसुलीसाठी महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढत नाही, असा घनाघाती आरोप केला.

वाचा : उपकरणे, चिकन, मटण, अंडी, मासे विक्रीस परवानगी

डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,  महाराष्ट्रात केवळ ८६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ७२ आणि ६४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. देशभरातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ९० टक्के लसीकरण केले आहे. कोरोना नियंत्रणाच्या कामात महाराष्ट्र सरकार आपली जबाबदारी का झटकत आहे, हेच समजत नाही. लस पुरविण्याबाबत केंद्र सरकार दक्ष असून राज्य सरकारना याबाबत सातत्याने माहिती दिली जात आहे. त्याहीपलिकडे जाऊन लोकांमध्ये दहशत पसरवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, असे खडे बोलही सुनावले आहेत.

वाचा: कटात सामील असल्याने मनसुखची हत्या

१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लसीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘काही राज्ये १८ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे अशी मागणी करत आहेत. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी आपल्या राज्यातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले आहे. परंतु त्यात अजिबात तथ्य नाही. दुसऱ्या डोसबाबत विचार केला तर महाराष्ट्रात केवळ ४१ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.’

सरकारचा ढिसाळ कारभार कारणीभूत
‘कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू आणि संसर्गाचे प्रमाण आहे. राज्यातील ढिसाळ कारभार हेच याचे प्रमुख कारण आहे,’ असे हर्षवर्धन म्हणाले.