Sat, Jul 04, 2020 14:35होमपेज › National › लॉकडाऊनमुळे ३२ कोटी लोकांवर बेरोजगारीचे संकट

लॉकडाऊनमुळे ३२ कोटी लोकांवर बेरोजगारीचे संकट

Last Updated: May 21 2020 2:17AM
कोल्हापूर : चंद्रकांत यादव/सुनील कदम

कोरोना विषाणूनेे संपूर्ण जगालाच अक्राळ-विक्राळ विळखा घातला आहे. कोरोनामुळे सव्वातीन लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले, एवढेच नव्हे तर लागण झाली नसलेल्या लोकांनासुद्धा तो मरणयातना देत आहे. कोरोना प्रकोपामुळे जगातील सुमारे 192 देश घायकुतीस आले आहेत. 180 देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्याने 43 कोटी उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. बेरोजगारीचा मोठा फटका जागतिक महासत्ता अमेरिकेलाही बसला असून सुमारे 3.8 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. 1942 च्या महामंदीनंतर सगळ्यात मोठा बेरोजगारी दर 14.7 टक्के होता. त्यावेळी 2 कोटी 5 लाख लोकांना रोजगार गमवावा लागला होता. भारतातील परिस्थितीविषयी आढावा घेताना सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) 19 मे रोजीच्या अहवालानुसार लॉकडाऊनमुळे भारतातील बेरोजगारीचा  सरासरी दर 23.8 टक्के झाला आहे. त्यात शहरी बेरोजगारी दर 26 टक्के तर ग्रामीण बेरोजगारी दर 22.8 टक्क्यावर पोहोचला आहे. मार्च मध्यात 6.74 टक्के असलेला बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये एकाच महिन्यात 15 टक्क्यांनी वाढला आणि याचा जबर फटका 135 कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय भारताला बसला आहे. नोकर्‍या गेल्या, उद्योग, व्यवसाय बंद पडल्याने अंदाजे 32 कोटी लोकांवर बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे. असंघटित क्षेत्रातील रोजगारही संपुष्टात आले आहेत.  

याच महिन्यात उबेर कंपनीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली आणि भारतातील 3 हजार कर्मचार्‍यांना आजपासून तुम्ही कामावर नाही, असे सांगून टाकले. कोरोना पार्श्‍वभूमीवर आलेल्या लॉकडाऊनमुळे संघटित क्षेत्रही धोक्यात आहे. एकट्या हवाई वाहतूक क्षेत्रावर अवलंबून असलेल्या 27 लाख लोकांचे भवितव्य अधांतरी आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात, वेतनकपात सुरू आहे. राब राब राबून दारिद्य्राची लक्ष्मणरेषा ओलांडणारे 12 कोटी भारतीय पूर्ववत दारिद्य्ररेषेलगत जाणार आहेत आणि 4 कोटी लोक नव्याने या रेषेवरून तळाकडे जातील.  हा अहवाल एकूणच धक्‍कादायक आहे. 2020-21 मध्ये जीडीपी मोठ्या प्रमाणावर घसरून शून्य टक्क्यावर येण्याचे भाकीत आर्थिक पाहणी करणार्‍या जागतिक पत मानांकन करणार्‍या संस्थांनी केले आहे. कोरोनापूर्वी देशात असलेला  7.6 टक्के बेरोजगारी दर कोरोना संकटामुळे 35 टक्क्यांवर जाण्याची भीती आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार सध्याच तो 23.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा बेरोजगारी दर 20.9 टक्क्यांवर आला आहे.  फेरीवाले, रस्त्याच्या कडेला उभे राहणारे विक्रेते, बांधकाम मजूर, हॉटेल व्यवसायातील वेटर, रिक्षावाले आदी घटक यांचे व्यवसाय बंद पडले आहेत आणि नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. 

यापूर्वी जगभराने डिसेंबर 2007 ते 2009 दरम्यानच्या जागतिक महामंदीचा मुकाबला केला. जागतिक जीडीपीत 27 टक्क्यांनी घसरण व बेरोजगारीचा दर 10 टक्क्यांवर असे भयावह आकडे तेव्हा जगाने अनुभवले. अमेरिका, इंग्लंडसारखे देश मंदीशी मुकाबला करण्यात तेव्हा हतबल ठरले होते; पण भारतावर या मंदीचा फारसा परिणाम झाला नव्हता. भारतातील कुटुंबव्यवस्था हे त्यामागचे कारण होते. आपल्याकडे पिढ्यान्पिढ्या रुजलेला पदराला दोन पैसे राखून ठेवण्याचा संस्कार आहे. तो त्यावेळी उपयोगाला आला होता. पण आता कोरोनाने बचतीचा हाच संस्कार अमेरिकेतही रुजतो आहे. अमेरिकन कामगार मंत्रालयाकडे बेरोजगार भत्ता मिळावा म्हणून तीन कोटी लोकांनी अर्ज केले आहेत. गेल्या 8 आठवड्यांत कोरोनामुळे हे सगळे बेरोजगार झाले आहेत. नजीकच्या भविष्यात बेरोजगारी आटोक्यात येईल, अशी स्थिती नाही. अमेरिकेत पाच मुलांमागे एक मूल उपाशी राहते आहे, ही देखील भीषण वस्तुस्थिती आहे. मार्च 2020 मध्ये अमेरिकन नागरिकांच्या क्रेडिट कार्ड वापरात तब्बल 30 टक्के घट झाली आहे. 34 कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण सध्या 16 टक्क्यांवर गेले आहे. मार्च 2020 मध्ये अमेरिकेत 4.4 टक्के बेरोजगारी होती. (आतापर्यंतची नीचांकी पातळी) अर्थशास्त्रज्ञांच्या मते ती इथून पुढे 20 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे प्रमुख गाय रायडर यांनी जगातील उद्योगविश्‍वाचे विश्‍लेषण करून अनेक उद्योग शेवटच्या घटका मोजत असल्याचे स्पष्ट केले आहे. आर्थिक आणीबाणीमुळे अशा शेवटच्या अवस्थेत असलेले अनेक उद्योग कायमस्वरूपी बंद पडून त्यामधील कामगारांना कायमस्वरूपी नोकर्‍या किंवा उद्योग गमवावा लागण्याचा धोका गाय रायडर यांनी व्यक्‍त केला आहे.

चीनवर अनेक देशांचा रोष असल्याने चीनमधील गुंतवणूक काढून घेऊन आगामी काळात इतरत्र ती करण्याकडे कल वाढणार आहे. अर्थात भारत या नव्या परिस्थितीचा कसा फायदा घेतो त्यावर सगळे अवलंबून आहे. जपानने तर चीनमधील गुंतवणूक टप्प्याटप्प्याने काढून घेणार व भारतात गुंतवणूक करणार असल्याचे बोलूनही दाखविले आहे. 

भारत घेईल उत्तुंग झेप

संयुक्‍त राष्ट्रांपासून ते अनेक खासगी संस्थांपर्यंत सर्वांनीच आगामी काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुजलाम् सुफलाम् असेल, हेच भाकीत वर्तविले आहे. आर्थर डी लिटिलच्या अहवालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’चा गौरव केला आहे. 

भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उचललेली पावले सध्याच्या आवश्यकतेनुसार भारताला योग्य दिशेने नेतील आणि आगामी काळात एका विशिष्ट टप्प्यावरून उत्तुंग झेप घेण्यासाठी आवश्यक असलेले बळ भारताच्या पंखांमध्ये असेल, असा शेराही या अहवालात नमूद आहे. 

जगातील 150 कोटी लोकांचे उद्योग, व्यवसाय, नोकर्‍यांवर गंडांतर

जीनिव्हा येथील ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ या संस्थेने ‘कोविड-19 अ‍ॅन्ड द वर्ल्ड ऑफ वर्क’ या नावाने एक विशेष अहवाल तयार केला असून या अहवालात जगभरातील नोकर्‍या आणि रोजगारांबाबतचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. या अहवालानुसार जगाच्या 760 कोटी लोकसंख्येपैकी 330 कोटी लोक नोकर्‍या किंवा छोटे-मोठे व्यवसाय करतात. यापैकी 200 कोटी रोजगार हे अनिश्‍चित आर्थिक क्षेत्राशी निगडित असल्यामुळे जागतिक मंदीचा सर्वाधिक आणि सर्वात पहिला फटका या उद्योगांना बसण्याचा धोका आहे. त्यामुळे जगभरातील 150 कोटी लोकांच्या नोकर्‍यांवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भुकेमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक : डेव्हिड बेस्ले

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या विश्‍व अन्‍न योजनेचे प्रमुख डेव्हिड बेस्ले यांनी जगाला भविष्यात कोरोनापेक्षा भूकबळीने जास्त लोक मरण्याचा धोका असल्याची भीती व्यक्‍त केली आहे. सध्या जगात 13.50 कोटी लोक दररोज उपाशी राहात आहेत. जगातील 82 कोटी लोक दररोज अर्धपोटी राहात आहेत. ही परिस्थिती  आणखी विदारक होईल. जसजशा लोकांच्या नोकर्‍या जातील, तसतसा भूकबळींचा धोका वाढत जाईल, असे भाकीत बेस्ले यांनी केले आहे.

अमेरिका पूर्वपदावर येण्यास सात वर्षे लागतील

या महामंदीतून जगाला आता एखादा चमत्कारच वाचवू शकतो, असे  नैराश्यपूर्ण उद‍्गार जपानच्या अर्थसंस्थेचे संचालक ख्रिस रप्की यांनी काढले आहेत. जगाची आणि प्रामुख्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी जवळपास सात वर्षे लागतील, असा इशारा बँक ऑफ अमेरिकेचे प्रमुख ब्रायन मोयनिहान यांनी दिला आहे.  

इंग्लंडमध्ये 300 वर्षांतील सर्वात मोठी मंदी

  ब्रिटन : 1706 नंतर 300 वर्षांतील सर्वांत मोठी मंदी. बँक ऑफ इंग्लंडच्या माहितीनुसार अर्थव्यवस्थेला 30 टक्के फटका शक्य. बेरोजगारीचा दर दुप्पट. देशातील प्रत्येक दहावी व्यक्‍ती बेरोजगार. 
  कॅनडा : कॅनडामध्ये एप्रिलच्या उत्तरार्धापर्यंत 10 लाख लोकांच्या नोकर्‍या गेल्या होत्या. कॅनडाचा बेरोजगारी दर 2.2 टक्क्यांवरून 7.8 टक्क्यांवर गेला आहे.
  जर्मनी : जर्मनीमध्ये  6.5 लाखांहून अधिक व्यावसायिकांनी कामाचे तास कमी करावेत म्हणून अर्ज सादर केले आहेत. 2008-09 च्या मंदीपेक्षा ही वाईट स्थिती आहे.
  इटली : इटलीमध्ये बेरोजगारीचा दर 5.80 वरून 13.10 वर आला आहे.