Tue, Jul 14, 2020 11:24होमपेज › National › आंध्र प्रदेश : गॅस गळती; दोघांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : गॅस गळती; दोघांचा मृत्यू

Last Updated: Jun 30 2020 8:48AM
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे पुन्हा एकदा गॅस गळती होण्याची घटना घडली आहे. यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही गॅस गळती परवदा येथील जवाहरलाल नेहरु फार्मा सिटी मधील सैनर लाइफ सायन्स फार्मा कंपनीत झाली. बेंझिमिडाझोल असे गळती झालेल्या गॅसचे नाव आहे. हा गॅस खूप विषारी असतो.

फार्मा कंपनीत रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गॅस गळती झाली. ज्यावेळी गॅस गळती झाली त्यावेळी फार्मा कंपनीत ३० लोक काम करत होते. अचानक सहा कामगारांना भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चारजणांवर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कंपनी तत्काळ बंद करण्यात आली.

या घटनेच्या चौकशीचे आदेश आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी दिले आहेत. गॅस गळती झालेल्या कंपनीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. अन्य ठिकाणी गॅस पसरलेला नाही, अशी माहिती परवदा पोलिस स्थानकाचे निरीक्षक उदय कुमार यांनी दिली आहे.