होमपेज › National › #CAB वरून संपूर्ण आसाममध्ये हिंसाचाराचा आगडोंब; पोलिसांच्या गोळीबारात २ ठार 

#CAB वरून संपूर्ण आसाममध्ये हिंसाचाराचा आगडोंब; पोलिसांच्या गोळीबारात २ ठार 

Last Updated: Dec 12 2019 8:39PM
गुवाहाटी (आसाम) : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर  करण्यात आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आसाम पेटला आहे. #CAB विरोधात संपूर्ण आसाममध्ये लोन पसरले असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांचा लष्कर आणि पोलिसांशी संघर्ष सुरू असल्याने काही ठिकाणी गोळीबाराच्याही घटना घडल्या. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने दुजोरा दिला आहे. गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. 

लष्करी जवान आणि पोलिसांवर लालुंग आणि गावन या गुवाहाटी परिसरातील भागात दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. आंदोलकांनी या घटनेत चौघे जखमी झाल्याचा दावा केला आहे. आंदोलकांनी अत्यंत आक्रमक आणि हिंसक पवित्रा संपूर्ण गुवाहाटी ठप्प झाली आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा दलांच्या तुकड्या असूनही त्या हतबल झाल्या आहेत. 

आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून देऊन रस्ते ठप्प केले आहेत. वाहनांची सुद्धा तोडफोड होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामवासियांना शांततेचे आवाहन केले आहे. गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. 

आसाममध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळल्याने कायदा आणि सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शाळांना २२ डिसेंबरपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. हिंसाचार वाढल्याने  ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील ४ पोलिस उपआयुक्त आणि १४ पोलिस अधीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. 

संतप्त झालेल्या जमावाने भाजप आणि आसाम गण परिषदेच्या कार्यालयांनाही आग लावून दिली. भाजप आमदार विनोद हजारिका यांचे छबुआमधील निवासस्थान पेटवून दिले. एक सर्कल ऑफिस सुद्धा पेटवून देण्यात आले. आंदोलकांनी अंबारीमधील आसाम गण परिषदेचे मुख्यालयाला आग लावली. आसामच्या १० जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.