Fri, Sep 18, 2020 23:22होमपेज › National › देशात बाधितांचा पुन्हा उच्चांक; दिवसात 64,399 रुग्णांची भर

देशात बाधितांचा पुन्हा उच्चांक; दिवसात 64,399 रुग्णांची भर

Last Updated: Aug 10 2020 1:12AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेतील कोरोना रुग्णवाढीच्या पाठोपाठ भारतातही दररोज रुग्णवाढीचा उच्चांक मोडला जात आहे. देशात गत तीन दिवसांपासून दररोज सरासरी 60 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. गेल्या चोवीस तासांत देशातील रुग्णसंख्येत आणखी उच्चांकी 64,399 बाधितांची भर पडली. ही आतापर्यंतची दिवसभरातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 21 लाख 53 हजार 10 झाली आहे. तर दिवसभरात देशात 861 रुग्णांचा बळी कोरोनाने घेतला आहे. अमेरिकेमध्ये चोवीस तासांत 13 जुलै रोजी 66 हजार 560 रुग्णवाढीची नोंद करण्यात आली होती.

कोरोनामुक्‍तांच्या संख्येचा आलेखही उंचावला आहे. देशात सध्या 29.2 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्‍तीचा दर हा 68 टक्क्यांहून अधिक झाला असल्याने दिलासा व्यक्‍त केला जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या 9 दिवसांमध्येच देशात 5 लाख 14 हजार 139 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर 4 लाख 23 हजार 79 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. 7 हजार 632 रुग्णांचा यादरम्यान मृत्यू झाला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत 64 हजार 399 कोरोना रुग्ण वाढले. तर 861 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात तब्बल 53 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्‍त झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 21 लाख 53 हजार 10 एवढी झाली आहे. यातील 14 लाख 80 हजार 884 रुग्ण (68.78 टक्के) कोरोनामुक्‍त झाले आहेत. तर 6 लाख 28 हजार 747 रुग्णांवर (29.2 टक्के) देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 43 हजार 379 रुग्णांचा (2.02 टक्के) कोरोनाने बळी घेतला.

सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 822 कोरोनाबाधितांची भर पडली. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेश (10,080), कर्नाटक (7,178), तामिळनाडू (5,883), उत्तर प्रदेश (4,660), बिहार (3,990), पश्‍चिम बंगाल (2,949) तसेच आसाममध्ये (2,218) कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. या राज्यांपाठोपाठ दिल्ली (1,404), केरळ (1,420) तसेच ओडिशामध्ये (1,643) नवीन कोरोेनाबाधितांची नोंद घेण्यात आली. गेल्या एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक 275 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह तामिळनाडू 119, आंध्र प्रदेश 89 तसेच पश्‍चिम बंगालमध्ये 52 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.

देशातील मृत्यू दर जगाच्या 3.73 टक्के तुलनेत 2.01 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर 3.45 टक्के नोंदवण्यात आला आहे.
शनिवारी आतापर्यंतच्या उच्चांकी कोरोना चाचण्यांची नोंद घेण्यात आली. 8 ऑगस्टला दिवसभरात 7 लाख 19 हजार 364 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात 2 कोटी 41 लाख 6 हजार 535 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे.

देशातील 1 हजार 402 लॅबमध्ये कोरोनासंबंधित तपासण्या करण्यात येत आहेत. यातील 713 लॅबमध्ये आरटी-पीसीआर तपासण्या केल्या जात आहेत. तर 577 लॅबमध्ये  ट्रूनेट आणि 112 लॅबमध्ये सीबी-नॅट तपासण्या केल्या जात आहेत. एकूण प्रयोगशाळांच्या नेटवर्कपैकी 940 सरकारी, तर 462 लॅब खासगी आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेतच तपासणीची व्यवस्था होती. 23 मार्चपर्यंत देशात 160 लॅब कोरोना तपासणीसाठी कार्यान्वित करण्यात आल्या. 8 ऑगस्टपर्यंत लॅबची संख्या 1 हजार 402 एवढी झाली आहे, अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

 "