नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताला युद्ध नको आहे. पंरतू, तसा कुणी प्रयत्न केल्या तर, त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची आमची क्षमता आहे. भारताच्या एक इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही. त्याचप्रमाणे ‘२६/११’चा हल्ला हा विसरण्याजोगा नाही, मात्र देशात पुन्हा तसा हल्ला घडविणे आता कोणालाही शक्य नाही; अशी ग्वाही देत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीन आणि पाकिस्तानलाही इशारा दिला. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘२६/११’चा हल्ला करीत देशाच्या सार्वभौमत्वास आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आता मी देशवासियांना ग्वाही देतो की देशात पुन्हा ‘२६/११’ सारखा हल्ला घडविणे कोणालाही शक्य नाही. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेस एवढी बळकटी प्रदान केली आहे की पुन्हा त्याची पुनरावृत्ती शक्यच नाही. मुंबई हल्ल्याप्रमाणेच घातपात घडविण्यासाठी पाठविण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांना नगरोटा येथे सुरक्षा दलांनी यमसदनी पाठविले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तानला दहशतवादाची मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पाकवर एफएटीएती टांगती तलवार आहे. त्याचप्रमाणे आता गरज पडल्या भारत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) पार करूनही कठोर प्रत्युत्तर देतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. जमिन, पाणी आणि आकाश या तिन्ही ठिकाणी भारताची सुरक्षा मजबूत आहे. भारत आता पूर्वीप्रमाणे सॉफ्ट टार्गेट राहिलेला नाही. भारतात असलेल्या प्रत्येक दहशतवादी जाळ्याला उध्वस्त करण्यात यश येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.