नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
एकीकडे देशभरात कृषी कायद्यांना प्रचंड विरोध होत असताना पंतप्रधान मोदींच्या बाजुने आरएसएस मैदानात उतरणार आहे. कृषी कायद्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी स्वयंसेवक कंबर कसणार आहेत. यासाठी आरएसए थेट रस्त्यावर उतरणार असून नव्या तंत्रज्ञानाचा आधारही घेणार आहेत. आरएसएस आता तरुणाईलाच कृषी कायदे समजावून सांगणार आहे.
वाचा : विधानसभा अध्यक्षपद : शिवसेनेला हवेत मुरब्बी पृथ्वीराज चव्हाण
नव्या कृषी कायद्यांवरून देशभरातील शेतकरी संघटनांनी दिल्लीची कोंडी केली आहे. पंजाब, हरियानातील शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाहीत. काहीही झाले तरी कायदे मागे घ्यायचे नाहीत, असा चंगच जणू केंद्र सरकारने बांधला आहे. त्यामुळे ही कोंडी फुटलेली नाही. कृषी कायद्यावरून वातावरण तापले असताना भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उघड समर्थनाची भूमिका घेत कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देण्याचे ठरविले आहे. आरएसएसने सरकार आणि भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच यांनी परस्पर चर्चा करून कायद्यांतील त्रुटींवर मार्ग काढावा, अशी भूमिका घेतली होती.
वाचा : सांगली महापालिका: जयंत पाटलांनी केला चंद्रकांत पाटलांचा दुसऱ्यांदा ‘कार्यक्रम’
सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने अजूनही नेमके काय होईल याचा अंदाज येत नाही. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा दबाव कायम असून सरकारीही अजून बॅकफूटवर आलेले नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्याच बाजुने उतरण्याचा निर्णय आरएसएसने घेतला आहे. यासाठी आरएसएस आता तरुणांना आपली भूमिका समजावून सांगणार आहे. यासाठी पथनाट्य, रॅप साँग आदींचा आधार घेतला जाणार आहे. सोशल मीडियावरूनही तरुणाईला मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय किसान संघाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. यात आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले जाईल. तसेच देशभरातील ५० हजारहून अधिक खेड्यांत जाऊन प्रचार करण्याबाबत चर्चा करण्यात येईल.