उत्तर प्रदेशात दहा हजार लोक स्थानबद्ध

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


अयोध्या : वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयातील रामजन्मभूमी मंदिर - बाबरी मशीद खटल्याचा निकाल उद्या दि. ९ रोजी सुप्रीम कोर्ट देणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 

राज्याचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील १६०० हून अधिक जणांच्या सोशल मीडिया अकाऊंटस्वर आम्ही करडी नजर ठेवलेली आहे. या अकाऊंटस्वर सामाजिक सलोख्याला धोका निर्माण करणारा मजकूर टाकला जाऊ शकतो, अशी आम्हाला शंका आहे. कुणीही तसले दुष्कृत्य केल्यास त्याला त्याबद्दलचे परिणाम भोगावे लागतील. वेळ पडल्यास राज्यातील इंटरनेट सेवा खंडित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पंचक्रोशी परिक्रमेचा समारोप होताच अयोध्येतील रामजन्मभूमीच्या दिशेने जाणार्‍या सर्व रस्त्यांवर दुचाकी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. भाविक आता या रस्त्यांवरून केवळ पायी जाऊ शकतील. शिवाय अयोध्येतील काही संवेदनशील भागांमध्ये चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. चौका-चौकातून सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात याच विषयाला वाहिलेला एक कंट्रोल रूम स्थापन केलेला आहे. कंट्रोल रूम 24 तास कार्यरत असेल. गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. अयोध्या तसेच लखनौ जिल्ह्यासाठी एक-एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याचेही आदेश त्यांनी दिले.

शांतता अबाधित राहावी म्हणून  राज्यात 10 हजार लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. 450 जणांना थेट कारागृहात डांबण्यात आले आहे. सुरक्षा दलांचा पायी संचलनावर अधिक भर राहील. लोकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आलेले आहे.

12 जिल्ह्यांत निमलष्करी दल
राज्यातील वाराणसी, कानपूर, अलीगड, लखनौ, आझमगडसारख्या 12 अतिसंवेदनशील जिल्ह्यांतून निमलष्करी दलाच्या 40 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. प्रशासनाने अतिरिक्‍त शंभर तुकड्यांची मागणीही केंद्राकडे नोंदविलेली आहे.

जमिअत उलेमाचे आवाहन
मुस्लिमांची एक संघटना जमिअत उलेमाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांनी शांतता व सद्भावना कायम ठेवावी, असे आवाहन केलेले आहे. जमिअत उलेमाने सर्व मशिदींना उद्देशून हे पत्र लिहिलेले आहे. शुक्रवारच्या प्रार्थनेला मशिदींतून एकत्रित आलेल्या मुस्लिम बांधवांना ते वाचून दाखवण्यात आले. सगळ्यांनी शांतता कायम ठेवावी. निर्णय आपल्या बाजूने झाला तरी आतषबाजी वगैरे करू नये आणि विरोधात गेला तरी निराश होण्याचे काही कारण नाही. जो निर्णय होईल, त्याचा प्रत्येकाने सन्मान करावा.