नवी दिल्ली /पालघर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील पालघरसह हिमाचल प्रदेश आणि हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले. मात्र, कोठेही मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही. महाराष्ट्रात पालघर येथे शनिवारी सकाळी नऊ वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. हा भूकंप 3.5 रिश्टर स्केलचा होता.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत जवळजवळ 6 ते 7 सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले असून भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार सकाळी 9:17 मिनिटाच्या भूकंपाची नोंद 3.5 रिस्टर स्केल इतकी करण्यात आली आहे. मात्र इतर भूकंपाच्या क्षमतेच्या नोंदी देण्यात आलेल्या नाहीत. डहाणू आणि तलासरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासून भूकंपाचे सत्र सुरू आहे.
अरुणाचल प्रदेशात शनिवारी पहाटे 4.24 मिनिटांनी 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र, कोणतेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातही शनिवारी सकाळी सात वाजता 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.