होमपेज › National › आंध्रात राजकीय संघर्ष पेटला; चंद्राबाबू नजरकैदेत

आंध्रात राजकीय संघर्ष पेटला; चंद्राबाबू नजरकैदेत

Published On: Sep 11 2019 10:10AM | Last Updated: Sep 11 2019 10:35AM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. आज हा राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला. एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील टीडीपी नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ चंद्राबाबू नायडू त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत उपोषणाला बसणार होते. त्यांच्या या घोषणेनंतर नायडूंच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवले आहे.

टीडीपीने आज सरकारच्या विरोधात गूंटूर जिल्ह्यातील चलो आत्मकरू अशी हाक देत मोठी रॅली आयोजित केली होती. मात्र, आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला होता. तसेच नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजला येथे जमावबंदी लागू केली. 

चंद्राबाबू नायडू सकाळी ९ वाजता आत्मकरूकडे रवाना होणार होते. मात्र त्यांना त्यांच्या निवासस्थानीच रोखण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी १२ तास उपोषण करणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना नजरकैदेत ठेवले आहे. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. त्यानंतर टीडीपीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे टीडीपीचे वरिष्ठ नेते अय्यन्ना पत्रादू यांना विजयवाडा रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले.