होमपेज › National › तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम; सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार

तामिळनाडूत 'जलिकट्टू'ची धूम; सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार

Last Updated: Jan 15 2020 1:20PM

जलिकट्टू खेळचेन्नई : पुढारी ऑनलाईन 

तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांत आयोजित केल्या जाणाऱ्या जलिकट्टू या पारंपरिक खेळाला विरोध करत त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाने आज नकार दिला. देखरेख समितीच्या देखरेखीखाली जलिकट्टूचे काही भागांत आयोजन करण्यास मद्रास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. यावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच याचिकाकर्त्याने हायकोर्टाकडे दाद मागावी, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. 

वाचा : आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

जलिकट्टू हा बैलांचा खेळ तमिळनाडूत तुफान लोकप्रिय आहे. तमिळींच्या पोंगल परंपरेत जलकिट्टूचे अनन्य स्थान आहे. तामिळनाडूमधील 'जलिकट्टू'  या पारंपरिक खेळास २००० वर्षाची परंपरा आहे. जलिकट्टू हा तामिळनाडूचा गावागावात चालणारा एक पारंपरिक खेळ प्रकार आहे. मकर संक्रांत म्‍हणजे पोंगल सणादरम्यान हा खेळ खेळला जातो. हा खेळ दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. या खेळात संपूर्ण राज्‍याभरातून बैल सहभागी होतात. या खेळामध्‍ये वर्षाला अनेकांना जीव गमावावा लागतो. तर अनेक लोक गंभीर जखमी होतात. या खेळात बैलही जखमी होतात. 

दरम्यान, मदुराईमधील अवनीयापुरम येथे बैलांच्‍या (वळू) या खेळाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. येथे ७०० बैल आणि ७३० बैल पकडणारे सहभागी झाले आहेत.

वाचा : कुठे शिवाजी राजे व कुठे 'हे' सर्व हवशे नवशे गवशे : शिवसेना

'जलिकट्टू' खेळ कसा खेळला जातो?

जेव्हा या खेळाला सुरुवात होते तेव्हा वळूंच्या शिंगांना पैसे बांधून त्यांना पळविले जाते. बऱ्याचदा गर्दीमुळे हे वळू गांगरुन जातात आणि ट्रॅकवर पळण्याऐवजी ते गर्दीमध्ये घुसण्‍याचा प्रयत्‍न करतात. काही वेळा या वळूंना मद्य देखील दिले जाते. त्यांनी जोरात पळावे म्हणून त्यांची शेपटी पिरगाळली जाते.

'जलिकट्टू'चा नेमका अर्थ काय?
तज्ज्ञांच्या मते 'जलिकट्टू' हे नाव या खेळाला त्याच्या वैशिष्ट्यामुळे पडले आहे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह असा होतो. या खेळात एक पिशवी बैलाच्‍या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे बैल पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये जेलिकट या विशिष्ट जातीच्या बैलांचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला 'जलिकट्टू' हे नाव पडले आहे. शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठे बक्षीस देखील दिले जाते.