Fri, Sep 18, 2020 19:55होमपेज › National › पीएम मोदींच्या ‘लॉकडाऊन’ निर्णयाचे सोनिया गांधी यांच्याकडून समर्थन

पीएम मोदींच्या ‘लॉकडाऊन’ निर्णयाचे सोनिया गांधी यांच्याकडून समर्थन

Last Updated: Mar 26 2020 6:30PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे समर्थन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही तातडीने करावयाचे उपायही सुचवले आहेत. तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ठोस पावले उचलण्याची विनंती केली आहे. शिवाय उद्योगांना आणि सर्वसामान्य लोकांना काहीदृष्ट्या दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, असा सल्ला ही सोनिया यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे. 

अधिक वाचा : कोरोना विरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमाकवच!

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात पुरवठा साखळीस मजुबूत करण्याची मागणी केली आहे. केंद्र शासनाने मासिक हफ्ते ६ महिन्यांपर्यंत थांबवले जावेत तसेच त्यासंदर्भातील व्याजही बँकांकडून माफ करण्यात यावे असा सल्लाही पत्राद्वारे दिला आहे. 

लॉकडाऊन दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होणारे कर्जही पुढील सहा महिन्यांकरिता रोखले जावे आणि केंद्राने प्रत्येक सेक्टर नुसार पॅकेज घोषित करावे, अशी मागणी सोनिया यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

अधिक वाचा : केंद्र सरकारकडून कोरोना लॉकडाऊनवर १ लाख ७० हजार कोटींचा उतारा!

संकटसमयी सर्व देश एकत्र

सोनिया गांधी यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘कोरोना विषाणूच्या साथीने लोकांचे जीवन धोक्यात आणले आहे. तसेच संपूर्ण देशभरात आणि विशेष करुन तळागाळातील लोकांच्या जीवनावर संकट ओढावले आहे. कोरोनाची साथ थांबविण्यासाठी आणि तिला हरविण्यासाठीच्या लढाईत संपूर्ण देश संघटित होऊन एकत्र उभा आहे’. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी पुढे म्हणतात, ‘कोरोना विरोधात लढण्यासाठी तुमच्या सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचे आम्ही समर्थन करतो. मी, विश्वास देते की, सरकार प्रयत्नांना आणि त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयांना आम्ही सहकार्य करु’.  

अधिक वाचा : कोरोनावर उपचारात जुनीच औषधे गुणकारी

न्याय योजना लागू करण्यात याव्यात 

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला आग्रह केला आहे की, सरकारने कोरोना विषाणूंच्या विरोधात लढत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्क आणि दुसऱ्या सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करुन द्यावेत. तसेच कामगार आणि गरिबांना दिलासा देण्यासाठी न्याय योजना लागू करण्यात याव्यात. तसेच त्यांच्या खात्यांमध्ये थेट आर्थिक मदत पोहोचवली जावी. सोनिया गांधी म्हणाल्या, की ‘यावेळी राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रस्तावीत करण्यात आलेली न्याय योजना अर्थात किमान वेतन योजना (न्यूनतम आय गारंटी योजना) लागू करणे सर्वात अधिक गरजेचे आहे. या कठीण समयी या साथीमुळे ज्या गरिबांवर सर्वात जास्त आर्थिक मार बसणार आहे त्यांना या योजनेतून अधिक दिलासा मिळेल.  

अधिक वाचा : केंद्राच्या 'कोरोना पॅकेज'वर अजित पवार म्हणाले...

शेतकरी वर्गासाठी केल्या या मागण्या

मागील लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी ‘न्याय योजना’ लागू करण्याचा विश्वास जनतेला दिला होता. या अतंर्गत देशातील पाच करोड गरीब कुंटुंबियांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे की, ‘या संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज आणि त्याचे व्याज सहा महिन्यांसाठी थांबविण्यात यावे. तसेच पुन्हा एकदा नव्याने कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे’. सोनिया गांधी यांनी पत्रामध्ये लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या अडचणींचा उल्लेख करताना म्हटले आहे, ‘ केंद्र सरकारने प्रत्येक सेक्टरनुसार विशेष पॅकेज दिले पाहिजे, तसेच करांमध्ये सवलत तसेच व्याजरक्कमेत माफी आणि कर्जदारांना सवलत दिली पाहिजे’.

 अधिक वाचा : राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी

 "