Fri, Sep 18, 2020 13:45होमपेज › National › देशात कोरोनाची उच्चांकी; २४ तासात ६४ हजारहून अधिक कोरोनाग्रस्त

देशात कोरोनाची उच्चांकी; २४ तासात ६४ हजारहून अधिक कोरोनाग्रस्त

Last Updated: Aug 09 2020 10:34AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतात कोरोना विषाणूमुळे बाधितांचा आकडा आता आणखी भीतीदायक होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात उच्चांकी ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून काल दिवसभरात ६४ हजारहून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ६४ हजार ३९९ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील बाधितांचा आकडा २१ लाख ५३ हजार ११ वर पोहचा आहे. कोरोना रुग्णसंख्येबाबत जगात पहिल्या क्रमांकावर असणार्‍या अमेरिकेलाही भारताने या कालावधीत मागे टाकले आहे. 

सध्या देशात ६ लाख २८ हजार ७४७ जणांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत १४ लाख ८० हजार ८८५ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे ४३ हजार ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. याच कालावधीत ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरुवारीच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा पार केला.

गेल्या ९ दिवसांपासून भारतात सातत्याने ५० हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारीही गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६१ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळल्यामुळे देशातील एकूण बाधितांची संख्या आता २१ लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. शुक्रवारी उच्चांकी ६२ हजार ५३८ लोक पॉझिटिव्ह आढळले होते. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. 
 

 "