Tue, Jul 07, 2020 05:44होमपेज › National › रिमुव्ह चायना अ‍ॅपची चलती

रिमुव्ह चायना अ‍ॅपची चलती

Last Updated: Jun 01 2020 10:14PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

स्मार्टफोनमधून चीनची अ‍ॅप्स ओळखून त्यांना अनइन्स्टॉल करणार्‍या रिमूव्ह चायना अ‍ॅप्सची सध्या प्ले स्टोअरवर चलती आहे. 17 मे रोजी लाँच झालेल्या या अ‍ॅपला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक यूजर्सनी डाऊनलोड केले आहे. भारतातही हे अ‍ॅप वेगाने व्हायरल झाले आहे. हे एक अँड्रॉईड अ‍ॅप असून, सध्या गूगल प्ले स्टोरअर टॉप फ्री अ‍ॅपच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि भारतीय सीमेवरील चीनच्या हालचाली यामुळे वाढत असलेल्या तणावाने देशभरात चीनविरोधी भावना असतानाच या रिमूव्ह चायना अ‍ॅपची चर्चा सुरू झाली आहे. याच चीनविरोधी भावनेतून टिकटॉक या अ‍ॅपचा पर्याय म्हणून मित्रों अ‍ॅपही प्रसिद्ध झाले आहे. 

एका सर्व्हेमध्ये कोरोना आपत्तीला चीनच जबाबदार असल्याचे 67 टक्के भारतीयांनी म्हटले होते. त्यातूनच अनेक भारतीय आता चिनी उत्पादने आणि चिनी अ‍ॅप्सना पर्याय शोधत आहेत. त्यातून मित्रों अ‍ॅपही 50 लाखांहून अनेकांनी डाऊनलोड केले आहे.

काय आहे रिमूव्ह चायना अ‍ॅप? 

या अ‍ॅपच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, हे अ‍ॅप शैक्षणिक उद्दिष्टांसाठी विकसित केले आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स कुठल्या देशांचे आहेत, याची ओळख पटवून देते. विशेषतः अ‍ॅपच्या नावाप्रमाणे चिनी कंपन्यांनी विकसित केलेल्या अ‍ॅप्सची ओळख पटवून देते आणि यूजर्सची इच्छा असेल तर चिनी अ‍ॅप्स अनइन्स्टॉलही करते. 17 मे रोजी गुगल प्ले स्टोअर आल्यानंतर केवळ 14 दिवसांतच 10 लाखांहून अधिक लोकांनी हे मोफत अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. याशिवाय गुगल प्ले स्टोअरवर त्याला 4.8 पॉझिटिव्ह रेटिंगही मिळाले आहे. या अ‍ॅपला लॉगिनची गरज नाही. वनटच अ‍ॅप लॅबद्वारे हे अ‍ॅप विकसित केले गेले आहे. ही कंपनी जयपूरची आहे.