Sat, Sep 19, 2020 07:31होमपेज › National › ते झोपले आहेत; देश परिणाम भोगत आहे!

ते झोपले आहेत; देश परिणाम भोगत आहे!

Last Updated: Jul 13 2020 10:26PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

भारत-चीन वादावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोमवारी राहुल गांधी यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता, ते झोपले आहेत आणि भारत त्याचे परिणाम भोगत आहे, अशी टीका केली. राहुल यांनी एक मीडिया रिपोर्ट शेअर करीत भाजप सरकारवर टीका केली आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी हे वक्‍तव्य अशा वेळी केले आहे, जेव्हा दोन्ही देशांच्या सैन्याने सीमेवरील शांततेसाठी वादग्रस्त क्षेत्रातून माघार घेतली आहे. केंद्र सरकारने गुरुवारीच चीनसोबत दुसर्‍या टप्प्यातील चर्चेची घोषणा केली होती. 

दरम्यान, राहुल गांधींनी शेअर केलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीनने जे काही केले त्याची योजना त्यांनी यापूर्वीच बनवली होती. भारत-चीनमध्ये 15 जून रोजी झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर तणाव वाढला होता. चीनचेही 40 सैनिक मारले गेले होते. मात्र, चीनने ते कबूल केले नाही. 

कोरोनाच्या स्थितीवर उपस्थित केले प्रश्‍न

कोरोना नियंत्रणाच्या मुद्द्यावरून प्रश्‍न उपस्थित करीत कोरोनाविरोधी लढाईत आपली स्थिती चांगली आहे का? असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंडसह इतर देशांचा कोरोना प्रकरणांचा एक तुलनात्मक आलेख शेअर केला आहे. आणि त्यावरून भारतातील कोरोनाच्या फैलावावरून प्रश्‍न केले आहेत. कोरोनाची वाढती आकडेवारी देत त्यांनी देशाची स्थिती चांगली आहे का? असा सवालही केला आहे. 

 "