Fri, Sep 18, 2020 11:50होमपेज › National › युपीएससीच्या उमेदवारांचे भवितव्य घडवणारे पोलिस अधिकारी महेश भागवत

युपीएससीच्या उमेदवारांचे भवितव्य घडवणारे पोलिस अधिकारी महेश भागवत

Last Updated: Aug 13 2020 4:30PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचे हात घ्यावे... कविवर्य विंदा करंदीकर यांच्या या अत्यंत भावगर्भ ओळी... याचीच प्रचिती येथील राचकोंडा पोलिस आयुक्तालयाचे कमिशनर महेश भागवत यांच्याकडे पाहिल्यावर येते. एक आयपीएस पोलिस अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द जेवढी कार्यतत्पर आहे. तितकेच त्यांचे सामाजिक बांधिलकीतून उभारलेले आणि अविरत सुरू असलेले कार्य मोठे आहे. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकत्व घेतलेल्या परीक्षार्थींनी भरघोस यश मिळवले. या नवोदित सनदी अधिकाऱ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. माजी केंद्रिय गृहसचिव पद्मभूषण के. पद्मनाभय्या यांच्याहस्ते या उदयोन्मुख अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महेश भागवत यांनी या परीक्षार्थींना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन केले. व्हॉट्स ॲपचा उपयोग फक्त पोस्ट फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात त्यांनी या सोशल मीडियाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी केला. ही संकल्पना उल्लेखनीय असल्याचे यावेळी पद्मनाभय्या यांनी सांगितले. सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन आणि सत्कार त्यांनी केला.

यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करताना महेश भागवत यांनी मोलाचा कानमंत्र सर्वांना दिला. यशस्वी उमेदवारांनी यशाची नशा डोक्यात शिरू देऊ नका, तसेच अपयशी उमेदवारांनी, अपयश मनाला लाऊन घेऊ नका असा सल्ला भागवत यांनी दिला. युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यासाठी चिकाटी गरजेची आहे. तसेच समर्पण, मेहनत करण्याची तयारी हवी. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना याचेच फळ मिळाले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एकूण ८२९ परीक्षार्थींचे पालकत्व स्वीकारले होते. त्यापैकी तब्बल सव्वाशे उमेदवार युपीएससीमध्ये यशस्वी ठरले. त्यातही १४ उमेदवारांना पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळाले. तर यातील तब्बल ७० यशस्वी उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील ५५ उमेदवार यशस्वी झालेत.

आंध्र प्रदेशचे विशेष वित्तसचिव साधू नरसिंह रेड्डी यांनी या उमेदवारांचे भागवत यांच्याबरोबर पालकत्व स्वीकारल्याचे समाधान आहे असे यावेळी सांगितले. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या गुणी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येते. आता निवड झालेल्या उमेदवारांनी आपली सेवा योग्य पद्धतीने आणि सचोटीने बजावावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यशस्वी उमेदवारांनी यावेळी त्यांच्या यशोगाथा सांगितल्या. या यशामध्ये पालक शिक्षकांच्याबरोबरच महेश भागवत यांचे पाठबळ अत्यंत मोलाचे होते, हे सर्वांनी आवर्जुन नमुद केले.

आयपीएस अधिकारी असलेले महेश भागवत दरवर्षी शेकडो होतकरु उमेदवारांना युपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करतात. त्यांचे नक्षली भागातील कार्य, वेश्या व्यवसाय आणि मानवी तस्करीला लगाम घालण्याची सचोटी, वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शाळा, अशा अनेक समाजकार्याची थेट अमेरिकेच्या सरकारनेही दखल घेतली आहे. एक अधिकारी म्हणून केवळ समोरचे काम सरकारी पठडीतून करणारे बहुतांश अधिकारी असतात. मात्र त्याचवेळी आपल्या अधिकारांचा समाजासाठी जास्तीत जास्त कसा उपयोग होईल या भूमिकेतून महेश भागवत कार्यरत आहेत. यातच त्यांचे वेगळेपण दिसून येते. युपीएससीच्या परीक्षार्थींना त्यांचा दरवर्षी लाभ होत आहे. यापुढेही होत राहील. 

 "