होमपेज › National › 'राष्ट्रवाद' शब्द वापरु नका, मोहन भागवतांनी त्यासाठी कारणही सांगितले!

'राष्ट्रवाद' शब्द वापरु नका, मोहन भागवतांनी त्यासाठी कारणही सांगितले!

Last Updated: Feb 20 2020 6:11PM
रांची : पुढारी ऑनलाईन 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावर मोठे विधान केले. मोहन भागवत म्हणतात की राष्ट्रवादासारखा शब्द नाझी आणि हिटलरची झलक दर्शवतो. झारखंडची राजधानी रांची येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी मोहन भागवत म्हणाले की, आरएसएसचा विस्तार हा देशासाठी आहे कारण आमचे ध्येय भारताला विश्वगुरू बनविणे आहे.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की राष्ट्रवादासारखा शब्द वापरु नये. कारण त्याचा अर्थ नाझी किंवा हिटलरमधून काढला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत राष्ट्र किंवा राष्ट्रीय यासारखे शब्द ठळकपणे वापरायला हवेत. ते म्हणाले की, इसिस, कट्टरतावाद आणि हवामान बदल यासारख्या समस्या सध्या जगासमोर एक मोठे आव्हान आहे.

येथे मोहन भागवत म्हणाले की विकसित देश काय करतात, त्यांना आपला व्यवसाय प्रत्येक देशात पोहोचवायचा आहे. याद्वारे त्यांना त्यांच्या अटी मान्य कराव्याशा वाटतात. आरएसएस प्रमुख म्हणाले की, जगासमोर असलेल्या मोठ्या समस्यांना भारतच मार्ग दाखवून देऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताने जगाचे नेतृत्व करण्याचा विचार केला पाहिजे. देशाची एकता ही खरी ताकद आहे, त्याचा आधार वेगळा असू शकतो परंतु उद्देश एकच आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की, हिंदू हा एकच शब्द आहे जो भारताला जगासमोर योग्य प्रकारे सादर करतो. देशात अनेक धर्म असूनही, प्रत्येक व्यक्ती हिंदू अशा शब्दाशी संबंधित आहे. हा शब्द देशाची संस्कृती जगासमोर दर्शवितो. ते म्हणाले की, देशाच्या विस्ताराबरोबरच संघ हिंदुत्वाच्या अजेंडावर पुढे जात राहील जो देशाला जोडण्यासाठी काम करेल.
संघ प्रमुख म्हणाले की आपण सर्वांनी माणुसकीसह जगायला शिकले पाहिजे, यासाठी देशावर प्रेम करणे आवश्यक आहे. संघात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना याबद्दल ज्ञान देतो.