Thu, Jul 09, 2020 06:07होमपेज › National › पंतप्रधानांच्या हस्ते कर्तारपूर कॉरिडॉरचे लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते कर्तारपूर कॉरिडॉरचे लोकार्पण

Last Updated: Nov 10 2019 1:39AM
गुरुदासपूर : वृत्तसंस्था

गुरुनानक देव यांच्या 550 व्या जंयतींच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायासाठी भक्‍तीचे परमोच्च स्थान मानल्या जाणार्‍या कर्तारपूर कॉरिडॉअरचे लोकार्पण केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, पंजाबमधील 117 आमदार, खासदार आदींचा समावेश असलेल्या 500 भाविकांचा जथ्था कर्तारपूरला रवाना झाला. 

पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिब आणि पंजाबमधील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना हा कॉरिडॉर जोडणार आहे. सुमारे 4.5 कि.मी.च्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या इंटिग्रेटेड चेक पोस्टचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी केले. या कॉरिडॉरबाबतच्या करारावर 24 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तानने स्वाक्षरी केल्या होत्या. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती.  भारतीय हद्दीतील सुमारे 15 एकर जागेत या कॉरिडॉरचा विकास करण्यात आला आहे. भाविकांना आवश्यक असणार्‍या सर्व अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी शीख समुदायासाठी सरकारमार्फत केल्या जाणार्‍या कार्याची माहिती दिली. आपल्या भाषणामध्ये त्यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 चाही उल्लेख केला. कलम 370 रद्द केल्याने तेथील शीख समुदायाला याचा फायदा होईल, असे मत मोदींनी व्यक्‍त केले.

कर्तारपूर कॉरिडॉरच्या भारतातील चेक पोस्टचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी शीख समुदायाशी संवाद साधला. यावेळी मोदींनी  शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची शिकवण केवळ शीख समुदायालाच नाही, तर सर्व भारतीयांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले. शीख समुदायाच्या शिकवणीचा आज वेगवेगळ्या माध्यमांतून जगभरामध्ये प्रसार केला जात असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी 1522 मध्ये गुरुनानक यांनी कर्तारपूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले, तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्‍वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी या ठिकाणाला खूपच महत्त्व आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून 4.5 कि.मी. लांब पाकिस्तानात स्थित आहे. कर्तारपूर गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे, यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे.