Thu, Jan 23, 2020 05:37होमपेज › National › पाकमध्ये दहशतवादाची पाळेमुळे 

पाकमध्ये दहशतवादाची पाळेमुळे 

Published On: Sep 12 2019 1:44AM | Last Updated: Sep 11 2019 11:10PM
मथुरा : वृत्तसंस्था

आपल्या शेजारी देशातच दहशतवादाची पाळेमुळे असून त्याचा मुकाबला करण्यास भारत सज्ज आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल चढविला. मोदी म्हणाले की, अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यास (9/11) 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही जगातील प्रत्येक देशाला दहशतवाद्यांचा धोका निर्माण झाला आहे. दहशतवादाची समस्या जागतिक स्तरावर आवासून उभी आहे. आपल्या शेजारी देशात तर दहशतवादाची पाळेमुळे आहेत. दहशतवाद्यांना आश्रय आणि अभय देणार्‍या देशाविरोधात संपूर्ण जगाने कठोर कारवाई करायला हवी. दहशतवादाचा मुकाबला करण्यास आम्ही सज्ज आहोत. दहशतवाद्यांना याआधीही आम्ही अद्दल घडवली असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दहशतवादी कारवाया थोपविण्यासाठी दहशतवाद प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच कृष्णाच्या नगरीत येण्याचे भाग्य मिळाले आहे. आज संपूर्ण विश्‍व पर्यावरण संरक्षणासाठी रोल मॉडेलचा शोध घेत आहे. पण, भारताकडे भगवान श्रीकृष्णासारखा प्रेरणास्रोत आहे. ज्याच्याशिवाय पर्यावरण प्रेमाची कल्पनाच अपूर्ण आहे, असे मोदी म्हणाले. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत असून हे वर्ष प्रेरणादायी वर्ष आहे. ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाच्या मागे तीच भावना दडलेली आहे. आजपासून सुरू होत असलेले हे अभियान प्लास्टिक कचर्‍यापासून मुक्‍तीला समर्पित केले आहे. प्लास्टिकपासून निर्माण होणार्‍या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. प्लास्टिक पशुधनाच्या मृत्यूचे कारण होऊ लागले आहे.