विजापूर : वृत्तसंस्था
नक्षल्यांनी अपहृत जवान राकेश्वर सिंह यांचे छायाचित्र बुधवारी जारी केले. संयुक्त कृती दलासोबत 3 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीअंती नक्षल्यांनी सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचे जवान राकेश्वर सिंह यांचे अपहरण केले होते.
जवान राकेश्वर सिंह यांचे नाव सुरुवातीला संयुक्त कृती दलाच्या शहिदांच्या यादीत होते. पुढे नक्षलवाद्यांनी माध्यमांना मेसेज करून राकेश्वर सिंह त्यांच्या (नक्षल्यांच्या) ताब्यात असल्याचे कळविले होते. यादरम्यान हवाई दलालाही सिंह यांचा मृतदेह न मिळाल्याने ते बेपत्ता असल्याचे कृती दलातर्फे जाहीर करण्यात आले.
जारी केलेल्या छायाचित्रात नक्षल्यांच्या छावणीत राकेश्वर बसलेले असल्याचे दिसत आहे. राकेश्वर सिंह सुरक्षित असल्याचे नक्षल्यांनी म्हटलेले आहे. राकेश्वर यांना जगरगुंडा परिसरात ठेवण्यात आले असावे, असा संयुक्त कृती दलाचा कयास आहे.
नक्षल्यांनी मागितली मध्यस्थांची नावे
नक्षल्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, सरकारने चर्चेसाठी आपल्या मध्यस्थांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी केली आहे. मध्यस्थांची नावे सरकारने जाहीर केल्यानंतर नक्षली जवानाची सुटका करतील, असेही नक्षल्यांनी म्हटले आहे.