Fri, Nov 27, 2020 10:27होमपेज › National › ‘एलओसी’वर भिरभिरणारे पाकचे क्‍वॉडकॉप्टर पाडले

‘एलओसी’वर भिरभिरणारे पाकचे क्‍वॉडकॉप्टर पाडले

Last Updated: Oct 25 2020 1:32AM
जम्मू : अनिल साक्षी

जम्मू आणि काश्मिरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी)  हेरगिरीच्या उद्देशाने घिरट्या घालणारे पाकिस्तानी सैन्याचे क्‍वॉडकॉप्टर भारतीय लष्कराने शनिवारी पाडले. कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

एका लष्करी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे क्‍वाडकॉप्टर शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ‘एलओसी’ परिसरात घिरट्या घालत असल्याचे येथे तैनात जवानांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करीत ते पाडले. हे क्‍वॉडकॉप्टर चिनी बनावटीचे आहे. ते डीजेआय कंपनीने तयार केलेले आहे. त्याचे मॉडेल ‘माविक-2 प्रो’ असे आहे.  ते पाकिस्तानच्या सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे (एसएसजी) असल्याची माहिती या अधिकार्‍याने दिली.  सुरुवातीला बराच वेळ हे क्‍वॉडकॉप्टर पाकच्याच हद्दीत घिरट्या घालत होते. त्यानंतर त्याने भारतीय हद्दीत प्रवेश करताच जवानांनी ते पाडले.

दरम्यान, एकीकडे भारतीय हद्दीत घुसखोरी करीत असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत  शुक्रवारी रात्रभर तोफगोळ्यांचा मारा केला. गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करून भारतीय जवानांना त्यात गुंतवून ठेवायचे आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवायचे, असा त्यांचा डाव होता. मात्र, दक्ष जवानांनी तो फोल ठरविला. पाकच्या सैनिकांनी सुरुवातीला भारतीय हद्दीत गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर त्यांनी तोफगोळ्यांचा मारा सुरू केला.

‘यूएव्ही’सारखे काम करते क्‍वाडकॉप्टर

क्‍वाडकॉप्टर हे ‘यूएव्ही’ किंवा ड्रोनप्रमाणे काम करते. त्याच्या माध्यमातून ‘एलओसी’ परिसरातील हेरगिरीचा प्रयत्न पाकिस्तानने यापूर्वीही केला आहे. शिवाय, दहशतवाद्यांना शस्त्रे आणि इतर साहित्य पाठविण्यासाठीही त्याचा वापर होतो.