Thu, Jan 21, 2021 00:37होमपेज › National › पल्लकडमधील हत्तीण मृत्यू प्रकरणी एकाला अटक

पल्लकडमधील हत्तीण मृत्यू प्रकरणी एकाला अटक

Last Updated: Jun 05 2020 2:33PM
तिरूअनंतपुरम : पुढारी ऑनलाईन
केरळमध्ये अननसात फटाके घालून हत्तीणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. केरळचे वनमंत्री के राजू यांनी याबाबतची माहिती दिलीय. वन विभागाने या प्रकरणी तपासाकरता ३ पथके नियुक्त केली होती. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच असा प्रकार यापुढे कधीच घडू नये यासाठी कडक कारवाई करण्यात येईल असेही राजू यांनी स्पष्ट केले.

केरळमधील पल्लकडमध्ये गर्भवती हत्तीणीला विकृत लोकांनी फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. खाताच ते फटाक्याने भरलेले अननस तोंडातच फुटले आणि हत्तीण गंभीररित्या जखमी झाली. ही घटना २७ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या एका गावात आली. ती भुकेने व्याकूळ झाल्याने इकडे तिकडे भटकू लागली. मात्र, काही विकृत लोकांनी तिच्या जिवाशी खेळ केला. फटाक्याने भरलेले अननस खायला दिले. तिच्या तोंडात ते अननस फुटल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. तरीसुद्धा तिने कोणाला कोणतेच नुकसान पोहचवले नाही. 

गंभीररित्या जखमी झाल्याने ती काहीच खाऊ शकत नव्हती. आपल्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी ती जखमी अवस्थेत वेल्लियार नदीकडे गेली. ती १८-२० दिवसात बाळाला जन्म देणार होती. असह्य होणाऱ्या यातना कमी होण्यासाठी आपले जखमी तोंड पाण्यात बुडवून उभी राहिली होती. तिथेच तिचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणानंतर देशभरात सोशल मीडियातून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. आता या प्रकरणातील एकजण पोलिसांच्या तावडीत सापडल्याने कडक कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.