Thu, Jun 24, 2021 12:34होमपेज › National › पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले : काँग्रेस

पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले : काँग्रेस

Last Updated: Jul 13 2020 12:55PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गेल्या दोन दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा हाती घेतलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजस्थानमधील सरकार मजबूत असून सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचे म्हटले आहे. 

रणदीप सुरजेवाला एका पत्रकार परिषदेत बोलत होते. कुटुंबात जर कोणी नाराज असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन त्यावर उपाय शोधला पाहिजे. काही मतभेद असतात. पण स्वतःच्या पक्षाला कमकुवत करणे हे चुकीचे आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यातर्फे मी सांगू इच्छितो की, सचिन पायलट आणि इतर कोणत्याही सदस्यांसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत, असे सुरजेवाला यांनी यावेळी म्हटले आहे. 

यासोबतच राजस्थानमधील सरकार स्थिर असून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करत भाजपकडून सरकार पाडण्यासाठी कोणतेही षडयंत्र रचले तरी त्यांना यश मिळणार नाही. असेदेखील सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. 

तसेच, पक्षातील कोणत्याही पदावरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर त्यांनी पुढे येऊन पक्षासमोर मांडावे. आम्ही ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु आणि सरकारही मजबूत ठेऊ. यासोबतच राज्यातील सरकार स्थिर राहण्यासाठी सर्व आमदारांनी बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहनही सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदमध्ये केले.