Thu, Jan 30, 2020 02:42होमपेज › National › घटनास्थळावरच आरोपींचा खात्मा; पोलिसांवर पुष्पवर्षाव अन्‌ बांधल्या राख्या! 

घटनास्थळावरच आरोपींचा खात्मा; पोलिसांवर पुष्पवर्षाव अन्‌ बांधल्या राख्या! 

Last Updated: Dec 06 2019 12:23PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

हैदराबाद जवळ पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला निर्दयीपणे जाळून मारण्याच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून करण्यात आली होती. पण आज पहाटे आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. पोलिसांच्या या कामगिरीचे लोकांनी कौतुक केले आहे. ज्या ठिकाणी पोलिसांनी आरोपींना गोळ्या घातल्या तेथे लोकांनी येऊन पोलिसांवर पुष्पवर्षाव केला. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली. येथे पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे लोकांना सांभाळण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पीडित महिला डॉक्टरच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना राख्या बांधल्या. तसेच काही महिलांनी पोलिसांना मिठाई भरवली. पीडितेचे वडील, बहीण यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या आत्मास आता शांती मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर पीडितेच्या बहिणीने, विक्रमी वेळेत न्याय मिळाल्याचे म्हटले आहे.

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियावरही पोलिसांचे कौतुक केले जात आहे. देशातील अन्य राज्यांतील पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून शिकावं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.