नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यादरम्यान रविवारी रात्री सुमारे दोन तास झालेल्या चर्चेनंतर चीनने पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून दीड ते दोन किलोमीटर आपले सैनिक मागे घेतले आहे. दरम्यान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न सुरु असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा सीमा विवाद मागील काही महिन्यांपासून उफाळून आला आहे. १५ जून रोजी चीनने धोकेबाजी करून २० सौनिकाना मारले होते. तेव्हापासून युद्धसदृश्य वातावरण निर्माण झालेले आहे. तणाव कमी करण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडल्या होत्या. पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रविवारी रात्री चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
सीमेवरील वादाचे मुद्दे सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान प्रतिनिधी निश्चित करण्यात आले आहेत. यात भारताकडून अजित डोभाल हे स्थायी प्रतिनिधी असतील. गलवानमध्ये जी घटना घडली, तशी घटना भविष्यात होऊ नये, यावर डोभाल-यी यांच्यात सहमती बनली. सीमेवरून टप्प्या-टप्प्याने सैन्य मागे घेण्याचेही ठरविण्यात आले आहे. यानुसार चीनने सोमवारी गलवान खोऱ्यातून आपले सैनिक दीड ते दोन किलोमीटर मागे घेतले आहे. वादाच्या विषयावर आगामी काळात चर्चा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारत आणि चीन यांच्यादरम्यानचा तणाव टोकाला पोहोचला आहे. ३० जून रोजी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये जी चर्चा झाली होती, त्यानुसार आता दोन्ही बाजूकडून सैन्य मागे घेतले जात आहे. चिनने आपले सैन्य तंबू, सामानासह मागे घेतले आहे. व्हेरिफिकेशनसाठी ७२ तासाचा कालावधी ठेवण्यात आला असून कोणत्याही प्रकारे सैनिक आमनेसामने येउ नयेत, यासाठी एक बफर झोन बनविण्यात आला आहे.
चीनसोबत सुरु असलेल्या तणातणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या शुक्रवारी अचानक लेहला पोहोचले होते. निमू नावाच्या पोस्टवर मोदी यांनी सैनिकांचा जोश वाढविला होता तसेच गलवानमधील चकमकीत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सैनिकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी विस्तारवादाचा काळ गेला असून आताचे युग विकासवादाचे असल्याचा इशारा दिला होता. पंतप्रधानांच्या लेह भेटीनंतर दोन्ही देशांदरम्यान राजकीय पातळीवर मार्ग काढण्याचा कयास लावला जात होता.
गलवान खोऱ्यातून सैन्य मागे घेत असल्याची पुष्टी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही आघाड्यांच्या अनुषंगाने पावले उचलण्यात आली आहेत. यानुसार सैनिकांना मागे बोलाविण्यात आले असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.