Tue, Jun 15, 2021 13:42होमपेज › National › कर्जाच्या परतफेडीस केंद्राकडून पुन्हा मुदतवाढीची शक्यता!

कर्जाच्या परतफेडीस केंद्राकडून पुन्हा मुदतवाढीची शक्यता!

Last Updated: Aug 01 2020 4:45PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्यास केंद्र सरकारकडून पुन्हा कर्जदारांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. बँकांनी मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध चालविला आहे. कर्जाची परतफेड करण्याला मुदतवाढ (लोन मोरेटोरियम) देण्यासंदर्भात सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेशी चर्चा करीत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. 

लोन मोरेटोरियमची सुविधा येत्या ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. यानंतरही कर्जदारांना कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते, असे शनिवारी अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी हॉस्पिटलिटी उद्योगाचे उदाहरण देताना हे क्षेत्र सर्वात जास्त प्रभावीत झाले असल्याचे सांगितले. चालूवर्षी या क्षेत्राला 90 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असेही त्या म्हणाल्या. 

चालू आठवड्याच्या सुरुवातीला भारती एंटरप्राइझेसचे उपाध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी लोन मोरेटोरियमची सुविधा देण्यात आली नाही तर अनुत्पादक मालमत्तेत म्हणजे एनपीएमध्ये जाणाऱ्या कंपन्यांची संख्या खूप जास्त असू शकते, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना एका बैठकीदरम्यान दिला होता. दुसरीकडे लोन मोरेटोरियमला बँकांनी जोरदार विरोध केला आहे. ताळेबंद आणि एकूण कामकाजावर यामुळे परिणाम होऊ शकतो, असे बँकांनी म्हटले आहे.