Thu, Dec 03, 2020 07:29होमपेज › National › कमलनाथ आणि दिग्विजय सिंग सर्वांत मोठे गद्दार : ज्योतिरादित्य

कमलनाथ आणि दिग्विजय सिंग सर्वांत मोठे गद्दार : ज्योतिरादित्य

Last Updated: Oct 27 2020 12:56AM
नवी दिल्ली : पीटीआय

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी आपल्या जुन्या राजकीय सहकार्‍यांवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशमधील सर्वात मोठे गद्दार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले, की या दोन्ही नेत्यांनी भ्रष्ट सरकार चालवून मतदारांचा विश्‍वासघात केला आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही लोकांच्या समस्यांकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे मला काँग्रेस पक्ष सोडावा लागला.

राज्यात होणार्‍या पोटनिवडणुकीत भाजप सर्व 28 जागांवर नसला तरी सर्वाधिक जागांवर विजय मिळवेल. ज्या 28 जागांवर पोटनिवडणूक होत आहे, त्यामध्ये 27 जागा काँग्रेसच्या होत्या. त्यामुळे भाजपकडे मिळविण्यासाठी सर्वकाही आहे आणि काँग्रेसचे  सर्वकाही पणाला लागले आहे, असा दावाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. राज्यात 3 नोव्हेंबरला 28 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 

यावर्षी मार्चमध्ये काँग्रेसमधील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 22 समर्थक आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे कमलनाथ यांनी 20 मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 23 मार्चला शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काँग्रेसचे अन्य तीन आमदारही काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते.