Wed, Sep 23, 2020 10:09होमपेज › National › कोरोनावरील रशियाने विकसित केलेल्या लसीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

कोरोनावरील रशियाने विकसित केलेल्या लसीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Last Updated: Aug 12 2020 11:47AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूवरील जगातील पहिलीच लस विकसित केल्याचे रशियाने सांगितले असले तरी ही लस सुरक्षित आहे की नाही याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संक्रमणावर लस आणल्याचे रशियाने जाहीर केल्यानंतर आरोग्य क्षेत्रात संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर कोरोनावरील लस मानवी वापरासाठी बाजारात आणली जात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी सांगितले होते. लस निर्मितीत रशियाने आघाडी घेतली असली तरी या लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता यावर अभ्यास करणे गरजेचे असल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोना लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स असता कामा नयेत. चांगली इम्युनिटी उपलब्ध करून देण्याबरोबरच लोकांचा कोरोनापासून बचाव होईल, अशी लस असली पाहिजे. कोरोनावरील लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची भारताची क्षमता आहे, असेही डॉ. गुलेरिया पुढे यांनी नमूद केले. 

कोरोनावरील लस रशियाने विकसित केली असून आपल्या स्वतःच्या मुलीला पहिला डोस देण्यात आला असल्याचे पुतीन यांनी जाहीर केले होते. रशियाने विकसित केलेल्या लसीला स्फुटनिक व्ही असे नाव दिले आहे. रशियाने सर्वप्रथम अवकाशात पाठविलेल्या यानाला स्फुटनिक असे नाव ठेवले होते. त्यावरूनच लसीला स्फुटनिक नाव देण्यात आले आहे.
 

 "