Mon, Jun 01, 2020 05:29होमपेज › National › इंटरनेट मुस्कटदाबीने अर्थव्यवस्थेला १९ हजार कोटींचा 'बांबू'

इंटरनेट मुस्कटदाबीने अर्थव्यवस्थेला १९ हजार कोटींचा 'बांबू'

Last Updated: Feb 20 2020 6:15PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशाच्या कोणत्याही भागात गडबड, दंगा किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारकडून सर्व प्रथम इंटरनेट सेवा खंडीत केली जाते. परिणामी, इंटरनेट बंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय)चे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी ही माहिती दिली. इंटरनेटवरील बंदीमुळे सर्वसामान्यांना केवळ अडचणींचा सामना करावा लागत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होते. असा दावा अहवालात करण्यात आला आहे. मॅथ्यूज यांच्या माहितीनुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत इंटरनेटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला १९ हजार ४८८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अधिक वाचा : 'शिवसेना सहन करेल पण भाजप आणि जनता तुम्हाला धडा शिकवेल'

मॅथ्यूज यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवरील भारतीय संशोधन परिषदेच्या (आयसीआरआयआर) अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, मोबाइल इंटरनेट १२ हजार ६१५ तास बंद होते. यामुळे १५ हजार १५१ कोटींचे नुकसान झाले. याशिवाय ३ हजार ७०० तास मोबाईल आणि फिक्स्ड लाइन इंटरनेट बंद पडल्यामुळे अर्थव्यवस्थेला ४ हजार ३३७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

त्याचबरोबर, नवी दिल्ली येथील सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटरने (एसएफएलसी) बनवलेल्या इंटरनेट शटडाउन ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, देशात २०१२ पासून भारतात ३८२ वेळा इंटरनेट खंडीत करण्यात आले. तर, या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ४ वेळा इंटरनेट शटडाउनचा सामना करावा लागला. 

अधिक वाचा : ‘१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत लक्षात ठेवा’

५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने संसदेत कलम ३७० हटविण्याची घोषणा केली. ही घोषणा करण्याआधीच्या आदल्यादिवशी म्हणजेच ४ ऑगस्ट २०१९ पासून संपूर्ण राज्यातील इंटरनेट सेवा खंडीत केली. त्यानंतर कालांतराने जम्मू-काश्मीरमधील काही भागातील इंटरनेट सेवा बहाल केली गेली. मात्र काश्मिरच्या काही भागात अजूनही इंटरनेटवर बंदी आहे. कोणत्याही लोकशाही देशातील ही सर्वात मोठी इंटरनेट असल्याचे अहवालात नमूद केले आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यासंबधी वृत्त देणा-या ’इंटरनॅशनल शटडाउन’ या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. 

यापूर्वी २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १३३ दिवस इंटरनेट बंद होते. त्यावेळी दहशतवादी बुरहान वाणीच्या हत्येमुळे काश्मीर खो-यात तणावाचे वातावरण होते. तसेच पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये गोरखालँडच्या प्रश्नावरून राजकीय व सामाजिक वातावरण तापले होते. गोरखालँडच्या मागणीसाठी अनेक स्थानिक संघटनांनी हिंसक आंदोलन केले. त्यामुळे तेथील इंटरनेट सेवा १०० दिवस खंडीत करण्यात आली होती. 

अधिक वाचा : नोटा सुद्धा धुवून घेणाऱ्या पत्नीचा पतीकडून खून