Mon, Oct 14, 2019 21:49होमपेज › National › मातृत्वही सीमेत! आई पाकिस्तानात, लेकरं हिंदुस्थानात!

मातृत्वही सीमेत! आई पाकिस्तानात, लेकरं हिंदुस्थानात!

Published On: Sep 23 2019 2:13AM | Last Updated: Sep 23 2019 2:11AM
बिजनौर : वृत्तसंसथा

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांत सध्या तणाव वाढलेला आहे. हा तणाव जेव्हा जेव्हा वाढतो, तेव्हा एका आईची घालमेल होते. सीमेच्या या बंधनांनी एका आईशी तिच्या दोन्ही लेकरांची ताटातूट झालेली आहे. भारतात लग्न केले त्याला 40 वर्षे उलटली. पण, तरीही या लेकरांच्या आईला भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही आणि तिची दोन्ही लेकरं पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवण्यासाठी ज्या ज्या अटी-शर्ती आहेत, त्या पूर्ण करण्याच्या स्थितीत नाहीत. म्हणून मग आईवर पाकिस्तानात तर लेकरांवर हिंदुस्थानात राहण्याची वेळ ओढवलेली आहे.

भारतातील बिजनौरचे हास्य कलावंत राशिद बिजनौरी यांचा विवाह पाकिस्तानातील कराचीच्या नाजनीन फातिमा ऊर्फ शबनम यांच्याशी 1979 मध्ये झाला. शबनम भारतात आल्या. पुढे अनेक वर्षे इथे राहिल्या. पती राशिद यांनी त्यांना भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून खूप खस्ता खाल्ल्या; पण तसे काही घडले नाही. गेल्याच वर्षी 26 ऑक्टोबरला ते मरण पावले. दरम्यान, शबनम यांना पाकिस्तानात रवाना व्हावे लागले. वडिलांच्या मृत्यूनंतर 27 नोव्हेंबरला रेशमा ही मुलगी आणि असद हा मुलगा पाकिस्तानात आईकडे गेले. 

गेल्या महिन्यातच 8 ऑगस्टला हे दोघे भारतात परतले आहेत. कराचीतील नाजमाबादमध्ये शबनम यांचे पिढीजात घर आहे. तीन-तीन महिन्यांच्या एनओसीवर कधी आई भारतात येते तर कधी लेकरं पाकिस्तानात जातात. असद आणि रेशमा यांना पाकिस्तानातील नागरिकत्वासाठी कडक अटी-शर्ती पूर्ण कराव्या लागतील. रेशमाने जर पाकिस्तानात लग्न केले तर तिला तिथले नागरिकत्व मिळू शकते. पण, तिला हे मान्य नाही. आता शबनम यांना भारतीय नागरिकत्व मिळावे म्हणून त्यांचे पती राशिद यांनी सुरू केलेली लढाई त्यांची लेकरे पुढे नेणार आहेत.