Tue, Sep 22, 2020 07:22होमपेज › National › #HyderabadHorror : धगधगत्‍या वास्‍तवातील भळभळत्‍या जखमा

धगधगत्‍या वास्‍तवातील भळभळत्‍या जखमा

Last Updated: Dec 02 2019 8:53AM

संग्रहित छायाचित्रसीमा पाटील 

काही घटना या फक्‍त घटना नसतात तर त्‍या भळभळत्‍या जखमा असतात. या जखमा मनावर खोलवर परिणाम करतात. या जखमा समाजाची स्‍त्रीकडे पाहण्‍याची मानसिकता दर्शवतात. अशा भळभळल्‍या जखमा कधीच भरुन येवू शकत नाहीत. हैदाराबादमध्‍ये अशीच मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून, देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रेटीही या घटनेवर संतप्त भावना व्यक्त करत सोशल मीडियाद्वारे आपले मत मांडत आहेत. यानंतर देशातील महिलांच्‍या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्‍थितीत होत आहे.  

सोशल मीडियावरून मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली वाहिली जात आहे. तिला न्याय दिला जावा, अशी मागणी आता देशभरात जोर धरु लागली आहे. अघोरी, पाशवी, निर्दयी, पाषाणहृदयी यांसारख्या शब्दांना नवे उदाहरण देणारी आणि या शब्‍दांनाही लाजवेल अशी ही क्रुर घटना आहे. या घटनेनंतर देशभरात कँडल मार्च काढले जात आहेत. निषेध व्‍यक्‍त केले जात आहेत. दोषींना फाशी द्‍या, जाळून, चिरुन टाका अशा तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. दोषींना फाशी किंवा कठोरातील कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, पण यामुळे महिलांकडे लैंगिकतेच्‍या उपभोगाच्या हेतूने पाहणार्‍या दूष्‍ट नजरातून त्‍यांची सुटका होणार आहे का? हा देखील प्रश्‍न निर्माण होतो. न्‍यायव्‍यवस्‍था त्‍याचे काम करेल मात्र माणूस म्‍हणून आपणास आपल्‍या जबाबदारीची जाणीव कधी होईल याचा देखील विचार करायला हवा. माणसा-माणसा आता तरी  होशील का माणूस असा प्रश्‍न स्‍त्री म्‍हणून माझ्‍या अंतरमनाला पडतो. 

स्‍त्री स्‍वतंत्र झाली आहे. पण तिचे स्‍वातंत्र्य समाजाने मान्‍य केले आहे का? आजही तिला कपडे कसे घालावे, कसे बोलावे किंवा कसे हसावे यांसारख्‍या गोष्‍टी समाजाकडून सुनावल्‍या जातात. हेही काळ्‍या दगडावरची पांढरी रेघ असल्‍यासारखेच आहे. तिला स्‍व:ताचे निर्णय स्‍व:ता घेता येत नाहीत. तिला नेहमी गृहित धरले जाते. जग बदलले म्‍हणून तिच्‍यावरचे अत्‍याचार थांबलेले नाहीत. आजही तिच्‍या वाट्‍याला उपेक्षाच येते. कारण तिच्‍यावरच्‍या अश्‍लील विनोदाला हसणारे आपणच असतो. तिच्‍याकडे बिचारी म्‍हणून पाहणारे आपणच असतो. घरी यायला तिला वेळ झाला तर तिच्‍या चारित्र्यावर शंका घेणारा हा समाजच असतो. एककीडे ती स्‍वतंत्र झाली म्‍हणून आराडाओरडा करायचा आणि दुसरीकडे तिच्‍यावर तोंड दाबून बलात्‍कार करायचा.. हे कसले स्‍वातंत्र्य?

खरचं ती आज सुरक्षित आहे का? तिला हव्या त्यावेळी, हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या कपड्यात हवे तशी फिरू शकते का? मध्यरात्री असेल किंवा दिवसाढवळ्‍या ती बस, रेल्वे, टॅक्‍सी, स्‍कुटीने 'सुरक्षित' प्रवास करू शकते ?... यासोबतच बलात्कार झालेल्या स्त्रीला स्वीकारण्याइतकी समाजाची मानसिकता बदलेली आहे का? पाषाणहृदयी समजाला आमच्‍या जखमांची वेदना कळणार का? स्‍त्रियांनी असेच काटेरी जंगलात जगायचे का?. काटे बोचून रक्‍त बंबाळ झाला तरी आम्‍ही 'आ' किंवा साधे 'चू' देखील करायचे नाही... कसली ही मानिसकता किंवा पुरषी व्‍यवस्‍था?  या सगळ्‍यात कुणी एवढे अघोरी, पाशवी, निर्दयी, पाषाणहृदयी कसे काय असू शकते? किंवा स्‍त्री असणे हा गुन्‍हा आहे का?...असे अनेक प्रश्‍न स्‍त्री म्‍हणून सतावत राहतात. 

काळानुसार समाज बदलला मात्र तिच्‍यासाठी आज समाजमन बदलले नाही. कारण आजही ती सुरक्षित नाही. एखाद्या  स्त्रीचे अस्तित्व 'योणी'वर येवून थांबते. जो भाग तिच्‍यावर जबरदस्‍ती करुन कोणीही मिळवू शकतो. आजही तिच्‍याकडे केवळ आणि केवळ उपभोगाची वस्‍तू म्‍हणूनच पाहिले जाते. समाजात असेच बलात्‍कार होत राहिले तर तिच्‍या मनात सुरक्षततेची भावना निर्माण होईल का? तिला आपण स्वतंत्र आहोत असे वाटेल का? मग ती सुरक्षीत, स्वतंत्र कशी, असा प्रश्‍न पडल्‍याशिवाय राहत नाही. समाजाचा घटक म्‍हणून मला याची कीव येते. सन्‍मान वैगेरे या गोष्‍टी खूप लांबच्‍या आहेत कारण इथे तिचा श्‍वासच दाबला जात असेल तर मग तिन्‍हे न्‍यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?

कोपर्डी, दिल्‍ली, कठुआ आणि आज हैदराबाद. आतापर्यंत घडलेल्‍या घटनेने  भारतीय न्यायव्यवस्था आणि कायदा अन् सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले. सरकार बदलले, कायदे बदलले पण मानसिकता अजून तीच आहे. हैवानीयत आणि राक्षसी वृत्ती अजून जिवंत आहे. हे आपले दुर्देव आहे. दोष द्यायचा तरी कुणाल. एकट्या आरोपीला की सगळ्या समाजव्यवस्थेला. कायद्याचे रक्षक ही कधी-कधी भक्षक बनतात. कित्येकदा आरोपी पुरावे सिद्ध न झाल्याने दोषातून सुटतात मग.. न्‍यायाची प्रक्रियेवरून सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 

जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलत नाही. तोपर्यंत किती जरी कडक कायदा केला तरी बलात्‍कार थांबणार नाहीत. म्‍हणूनच बलात्‍कारासारखे पाशवी प्रकार थांबण्यासाठी समाजातील प्रत्‍येकाने आपल्‍या विचारात बदल करण्याची आणि स्‍त्री जातीकडे बघण्याचा दृष्‍टीकोन बदल्‍याची गरज आहे.  यासाठी जाणीवपूर्वक स्‍त्रीयांचे हक्‍क, त्‍यांच्या भावना, त्‍यांच्या आवडीनिवडीचा आदर करण्यासोबतचं सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे त्‍यांची सुरक्षिततेचा विचार करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे अगदी एखाद्या आरोपीला जिवंत जाळण्‍याचा किंवा फाशीची शिक्षा दिली म्‍हणजे बलात्कार थांबणार नाहीत. कारण अशा घटनेत माणसाची विकृती आधोरिकीत होत असते. त्‍यामुळे एकाला शिक्षा दिली तरी विकृती दुसऱ्याच्या रुपाने पुन्हा समोर येत असते. त्‍यामुळे आपल्‍या समाजातील उपभोगवादी विचारसरणीला लगाम घालण्याची वेळ आली आहे. तसेच आता प्रत्‍येक पुरूषानेदेखील एकदा विचार केला पाहिजे की, माझ्‍यामुळे 'ती' सुरक्षीत आहे का? 'ती' देखील समाजाचा भाग आहे. तिला देखील जगण्‍याचा, फुलपाखारासारखे मनमुराद बागडण्‍याचा आधिकार आहे. समाजाचा घटक म्‍हणून तिचा जगण्‍याचा अधिकार आहे. 

अशा विकृतीमुळे तिच्‍या स्‍वातंत्र्यावर गदा येत असेल तर समाजाचा भाग म्‍हणून अशी मानसिकता मुळापासून ठेचून काढण्याची भावना जरी समाजातून तीव्रपणे पुढे येत असली तरी, समाजातल्‍या क्रुर मानसिकतेला, उपभोगाच्या विचारसरणीवरच वरमी घाव घालून त्‍यात बदल केला पाहिजे. तरच समाजातले महिलांवरचे असले किळसवाणे आणि समाजाला काळीमा फासणारे प्रकार थांबतील नाहीतर भय इथले संपत नाही अशी परिस्थिती कायम राहील....व धगधगत्‍या वास्‍तवातील भळभळत्‍या जखमा या मनाला वेदनारुपी सलत राहतील.....


 

 "