Tue, Aug 04, 2020 13:14होमपेज › National › तामिळनाडू कोठडीत मृत्यू; मानवाधिकारची नोटीस

तामिळनाडू कोठडीत मृत्यू; मानवाधिकारची नोटीस

Last Updated: Jul 02 2020 10:14PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : वृत्तसंस्था

तामिळनाडूत पिता-पुत्राच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसही अडचणीत आले असून, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) राज्याचे पोलिस महासंचालक व थुथूकुडी जिल्ह्याच्या पोलिस महासंचालकांना नोटीस पाठवली आहे.

तसेच चौकशी अहवालासह शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय उपचाराचा तपशील, महादंडाधिकार्‍यांचा तपासाचा अहवाल आणि आरोग्य तपासणीचा अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पी. जयराज (वय 62) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (32) यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. लॉकडाऊन काळात परवानगीपेक्षा अधिक काळ दुकान सुरू ठेवल्यावरून मोबाईल दुकानातून त्यांना अटक केली होती. अटकेनंतर चार दिवसांनी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी, त्यांना बेदम मारहाण केली गेल्याचा आरोप आहे. या दोघांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावरून ‘जस्टिस फॉर जयराज अँड बेनिक्स’ ही मोहीम संपूर्ण तामिळनाडूत सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपवले आहे. सरकारने वारसांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक आणि अण्णाद्रमुकने प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.