Mon, Aug 10, 2020 08:02



होमपेज › National › विद्यापीठ परिक्षांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी!

विद्यापीठ परिक्षांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी!

Last Updated: Jul 06 2020 11:07PM




नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महारोगराईच्या संकटामुळे चालू शैक्षणिक सत्रामध्ये रखडलेल्या परिक्षांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे विद्यापीठ तसेच शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. ​विद्यापीठांच्या परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगांच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचना तसेच मानक कार्यप्रणाली (एसओपी) नूसार घेण्यात याव्यात असे निर्देशही गृह मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. 

अंतिम वर्षातील परीक्षा घेतल्याच पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करणे योग्य नाही. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आधीच या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंबंधी यूजीसी आग्रही होते. अखेर मंत्रालयाच्या निर्देशांनंतर परीक्षा घेण्यास होणारा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. सीबीएसई, नीट, जेईई सारख्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यापीठांच्या परीक्षांही रद्द होणार अशी शक्यता त्यामुळे वर्तवली जात होती. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाबसह अनेक राज्यांनी आधीच परीक्षा रद्द केल्या आहेत. पंरतु, यूजीसीच्या गाईडलाईन्स राज्यांवर बंधनकारक असतीलच असे नाही. त्यामुळे राज्यात परीक्षा होणार की नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र सरकार तसेच विद्यार्थी संघटनांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यासंबंधी वाद पेटला होता. 

राज्य सरकारने परस्पर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला राज्यपालांनी विरोध दर्शवला होता. परीक्षा घेण्यासाठी भाजप तसेच इतर विद्यार्थी संघटना आग्रही होते. परीक्षा घेतल्या नाही, तर ही चालू शैक्षणिक सत्राच्या बॅचला कोरोना 'कोरोना बॅच' म्हणून कुप्रसिद्धी मिळेल, अशी भीती भाजपकडून व्यक्त करण्यात आली होती. तर, कोरोनाच्या काळात मुलांच्या जीवाशी खेळ कशाला असा युक्तीवाद करुन परीक्षा न घेण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकमत होते. महाराष्ट्रासह भाजपशासित काही राज्यांनीही परीक्षा रद्द करण्याची मागणी यूजीसीकडे केली होती.