Tue, Aug 04, 2020 13:43होमपेज › National › भारतीय भूभागावर चीनने रडार अन् हेलिपॅड बनविले आहे का?

भारतीय भूभागावर चीनने रडार अन् हेलिपॅड बनविले आहे का?

Last Updated: Jul 04 2020 10:09PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर टीका करीत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. काँग्रेसने गलवान खोर्‍यातील सॅटेलाईटद्वारे घेतलेली छायाचित्रे सादर केली आहेत. या छायाचित्रांत भारतीय हद्दीत चिनी सैनिकांचे तंबू लागलेले दिसत आहेत. 

पँगाँग त्सो सरोवर येथे चिन्यांनी घुसखोरी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या भारतीय भूभागावर चीनने अतिक्रमण करून रडार, हेलिपॅड आणि इतर सुविधा सुरू केल्या आहेत का? असा सवालही काँग्रेसने केला आहे.

सिब्बल यांनी म्हटले आहे की, १६ बिहार रेजिमेंटच्या २० जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या गलवान खोर्‍यासह पेट्रोल पॉईंट १४  वर चीनने ताबा मिळविला आहे. चीनने भारतीय हद्दीतील हॉट स्प्रिंग्ज परिसरावरही ताबा मिळविला आहे का? चीनने देप्सांग भागात वाई जंक्शनपर्यंत (१८ कि.मी.) आमच्या जमिनीवर ताबा मिळविल्यामुळे भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या डीबीओ विमान तळाला धोका निर्माण केला आहे.

पंडित नेहरू नेफा येथे गेले नव्हते का? काँग्रेसचा सवाल

काँग्रेसने आणखी एक छायाचित्र जारी केले आहे. या छायाचित्रात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सैनिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. या छायाचित्राद्वारे चीनने भारतीय सीमेवर घुसखोरी केल्याचे सांगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सीमारेषेवर गेले नव्हते का? पंडित जवाहरलाल नेहरू १९६२ मध्ये नेफा येथे गेले नव्हते का? असा सवाल केला आहे. सिब्बल यांनी पंतप्रधान मोदी सीमेपासून २३० कि.मी. दूर नीमू लेह येथेच थांबले होते, अशी टीका केली आहे.

लडाखच्या सर्वपक्षीय नागरिकांनी यापूर्वीच लिहिले पंतप्रधानांना पत्र

कपिल सिब्बल यांनी सांगितले की, चीनने आपला भूभाग बळकावल्याबाबतचे पत्र फेब्रुवारी २०२० मध्ये लडाखमधील सर्वपक्षीय लोकांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविले आहे. मात्र, त्यावर काय कारवाई केली? पंतप्रधान मोदी यांनी वेळीच पावले उचलली असती, तर चीनचे अतिक्रमण यापूर्वीच रोखता आले असते.

भारताने चीनच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे सांगावे की, चीनने भारतीय जमिनीवर अवैधरीत्या मिळविलेला ताबा आता सोडायला पाहिजे. आता हाच एक राजधर्म आहे, याचे पालन केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत केले पाहिजे, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.