Tue, Jun 15, 2021 12:12
ऑक्सिजनसाठी हरदयाल सिंग यांनी १० हजार झाडे लावली, त्यांचाच ऑक्सिजन अभावी मृत्यू 

Last Updated: Jun 10 2021 8:18PM

पटियाला; पुढारी ऑनलाईन : हरदयाल सिंग यांचा गेली १२ वर्षे एकच दिनक्रम होता. प्रत्येक सकाळी आपल्या सायकलवर रोपे आणि माती लादायची आणि गावाची स्मशानभूमी गाठायची. तेथे त्यांचे एक स्वतःचे छोटे जंगलच होते. तेथे नवी रोपे लावायची आणि जुन्या रोपांना पाणी घालायचे. ते पाणी आपल्या साकलवरुन तिथपर्यंत न्यायचे. त्या भागात सायकलवरुन झाडांना पाणी घालत दोन तीन चकरा मारायचे. 

कोव्हॅक्सिन कोव्हिशिल्डपेक्षा इतकी महाग का आहे? 

गेल्या बारा वर्षात त्यांनी पटियालामधील धाबलान गावात १० हजार झाडे लावली आणि जगवली. त्यांच्या पत्नी कुलविंदर कौर ही माहिती दिली. त्यांनी गावात ऑक्सिजन आणि शुद्ध हवा मिळावी यासाठी हा उपक्रम राबवला. पण, हे सर्व गेल्या महिन्यात संपले. हरदयाल सिंग यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना पहिल्यांदा बेड मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना कसाबसा एक बेड मिळाला पण, काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांना १७ मे रोजी कोरोना झाल्याचे समजले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर १८ मे रोजी त्यांना गावकऱ्यांनी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना बेड मिळत नव्हता. अखेर २८ तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना ऑक्सिजन बेड मिळाला. तोही गावापासून २ तासाच्या अंतरावर असणाऱ्या चंदीगडमध्ये. 

१९ मे रोजी हरदयाल सिंग यांना चंदीगडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी खूपच कमी होती. रुग्णालयात व्हेंटिलेट बेडही उपलब्ध नव्हता. त्यांना फक्त ऑक्सिजन लावण्यात आला. अखेर त्यांना २३ मे रोजी व्हेंटिलेटर लावण्यात आला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते वाचू शकले नाहीत. त्यांचे २५ मे रोजी निधन झाले. 

कोरोना योद्ध्यांचा लडाखमधील प्रवास

हरदयाल सिंग यांची पत्नी कुलविंदर कौर म्हणाल्या की, 'ज्या व्यक्तीने गावातील ऑक्सिजन पातळी वाढावी म्हणून झाडे लावली. हवा शुद्ध करण्यासाठी झाडे लावली. त्यांनाच परमेश्वराने ऑक्सिजन दिला नाही. हे कसले नशीब.'

त्या पुढे म्हणाल्या 'त्यांना त्यांच्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे साधे खाली वाकताही येत नव्हते. पण, ते झाडे लावण्यासाठी कायम धडपडत असत. ते झाडांना त्यांच्या सायकलवरुन पाणी घालत. मी त्यांना एखादी गाडी तरी घ्या असे म्हणायचे. त्यावेळी ते गाडीमुळे प्रदुषण होते असे म्हणत आणि आपली सायकलच वापरत.'

कोरोना : मृतांच्‍या आकडेवारीत अचानक वाढ कशी झाली? 

'ते कायम म्हणायचे की मला जास्ती जास्त झाडे लावयाची आहेत. मी त्यांना तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असे सारखे सांगायची पण त्यांनी ऐकलं नाही.'