गुजरात राज्यसभा निवडणूक स्वतंत्रच

Published On: Jun 26 2019 1:41AM | Last Updated: Jun 25 2019 11:58PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्रपणे निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे राज्यात दोन जागांसाठी स्वतंत्रपणे निवडणुका घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी स्वतंत्रपणे निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. यास आक्षेप घेत काँग्रेस पक्षाने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरमधून विजय मिळवला होता, तर स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून विजय मिळवला होता. दोघेही गुजरातमधील राज्यसभा सदस्य होते. या दोन जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. दोन्ही जागा एकाचवेळी रिकाम्या झालेल्या असताना स्वतंत्रपणे निवडणूक घेण्याची गरज काय, असा सवाल काँग्रेसने याचिकेद्वारे उपस्थित केला होता. आयोग आणि काँग्रेसची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठाने काँग्रेसची याचिका फेटाळून लावली.