Mon, Jan 18, 2021 10:25होमपेज › National › Google भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक!

Google भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक!

Last Updated: Jul 13 2020 5:28PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी संवाद साधला. या चर्चेनंतर पिचाई यांनी भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आल्याची घोषणा केली. 

पिचाई म्हणाले, आज मला गुगल फॉर इंडिया डिजिटलायझेशन फंडची घोषणा करताना आनंद झाला आहे. या उपक्रमांतर्गत आम्ही येत्या पाच ते सात वर्षांत १० अब्ज डॉलर्स अर्थात ७५ हजार  कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात करणार आहोत. इक्विटी, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्ममातून केली जाईल.

आणखी वाचा : तर देशाला जबर किंमत मोजावी लागणार!

पिचाई पुढे म्हणाले की, गुगलची गुंतवणूक भारताच्या डिजिटायझेशनच्या चार प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित असेल. यामध्ये प्रत्येक भारतीयांना प्रत्येक भाषेत परवडणारी माहिती प्रदान करणे, भारताच्या गरजेनुसार नवीन उत्पादने आणि सेवा तयार करणे, डिजिटल परिवर्तनासाठी व्यवसाय सक्षम बनविणे आणि आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्राचा शाश्वत विकास करणे, यांचा समावेश आहे.

पिचाई यांनी, कोविड १९ संबंधी जनजागृती करण्यासाठी आणि कोविड १९ विषयी लोकांना विश्वसनीय माहिती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी उचललेल्या लॉकडाऊनच्या कठोर पावलामुळे या साथीच्या आजाराविरुद्ध पुकारलेल्या भारताच्या लढाईचा पाया अधिक मजबूत झाला, असे पिचाई यावेळी म्हणाले. 

आणखी वाचा : दूरसंचार कंपन्यांना दणका; प्रीमियम योजनांना 'ट्राय'ने लावला लगाम!

चुकीच्या माहिती विरुद्धच्या लढ्यात आणि आवश्यक सावधगिरी बाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात गुगलने पार पाडलेल्या सक्रीय भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आरोग्यसेवा पुरविण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी देखील त्यांनी चर्चा केली.

भारतीय जलद गतीने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत त्याचा अवलंब करीत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांना होत असलेला तंत्रज्ञानाचा फायदा आणि कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) संभाव्य व्यापक लाभांविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. विद्यार्थ्यांसह शेतकरी देखील वापरू शकतील अशा आभासी प्रयोगशाळेच्या कल्पनेविषयी पंतप्रधानांनी सांगितले. 

आणखी वाचा : पद्मनाभस्वामी मंदिरावरील त्रावणकोर राजघराण्याचा हक्क कायम; सुप्रीम कोर्टाचा निकाल

यावेळी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधानांना देशातील गुगलची नवीन उत्पादने आणि उपक्रमांबद्दल माहिती दिली. बंगळुरूमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन प्रयोगशाळा सुरू करण्यासंदर्भात माहिती दिली, तर पुराचे अंदाज वर्तवण्यासंदर्भातील गुगलच्या प्रयत्नांच्या फायद्यांवर प्रकाशझोत टाकला.

आणखी वाचा : वाहन नोंदणीसाठी आता फास्टॅग बंधनकारक

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निधी सुरू करण्याविषयी आणि धोरणात्मक भागीदारी विकसित करण्याच्या गुगलच्या योजनेबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. 

पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात खुल्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक आहे. पंतप्रधानांनी यावेळी, कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी सरकारने नुकत्याच केलेल्या उपाययोजनांविषयी आणि नवीन रोजगार निर्मितीच्या मोहिमेविषयी सांगितले. तसेच त्यांनी नव्याने कौशल्य निर्मितीचे महत्त्वही अधोरेखित केले.

आणखी वाचा : 'ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही' 

डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भातील चिंता या मुद्द्यावर पंतप्रधानांनी चर्चा केली. पीएम मोदी म्हणाले, तंत्रज्ञान कंपन्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सायबर हल्ल्यांच्या प्रकारातील सायबर गुन्हे आणि धमक्यांबाबतही मोदींनी पिचाई यांच्याशी चर्चा केली. 

ऑनलाईन शिक्षणाची व्याप्ती वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक भाषेत तंत्रज्ञानाचा वाढती उपलब्धता, क्रीडा क्षेत्रात, स्टेडियमसारखे पाहण्याचा अनुभव देण्यासाठी एआर/व्हीआरचा वापर आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रातील प्रगती आदी मुद्द्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

आणखी वाचा : सर्वांत दिलासादायक बातमी! रशियात कोरोनावरील लसीची मानवी चाचणी यशस्वी