काँग्रेसला राष्ट्रीय मुख्यालयासह सोडावी लागणार चार कार्यालये?

Last Updated: Aug 05 2020 11:58AM
Responsive image
काॅंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वधेरा


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांना दिल्लीतील पॉश लोधी इस्टेटमधील बंगला सोडावा लागल्यानंतर पक्षाला आता २४, अकबर रोड या मुख्यालयासह ल्यूटिन्स झोनमधील इतर चार कार्यालये सोडावी लागू शकतात. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या मालमत्ता विभागाने काँग्रेसला बंगले रिकामी करण्याची नोटीस दिली होती, या प्रस्तावावर आता नव्याने विचार सुरु झाला असल्याचे सूत्रांनी बुधवारी सांगितले.

वाचा : Live श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन : पंतप्रधान बजरंगबलीच्या चरणी लीन

मालमत्ता विभागाच्या ताज्या प्रस्तावाला जर अंतिम मंजुरी मिळाली तर काँग्रेसला २४ - अकबर रोड या राष्ट्रीय मुख्यालयासह २६ - अकबर रोड, ५ - रायसीना रोड आणि चाणक्यपुरी स्थित सीआयआय/१०९ ही इमारत रिकामी करावी लागू शकते. २४, अकबर रोडवर काँग्रेसचे मुख्यालय वर्ष १९७६ पासून कार्यरत आहे. २६ - अकबर रोडवर काँग्रेस सेवा दलाचे कार्यालय असून ५ रायसीना रोडवर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे कार्यालय आहे. 

वाचा : कायदामंत्र्यांनी शेअर केलं संविधानाच्या 'मुलभूत अधिकार' पानावरील प्रभू रामचंद्रांचे चित्र 

मालमत्ता विभागाने कार्यालये रिकामी करण्याचा प्रस्ताव २०१८ सालीच आणला होता. २४ - अकबर रोड रिकामी करण्याची मुदतवाढ संपल्यावर पाच महिन्यांनी मार्च २०१९ मध्ये कार्यालय रिकामा करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अकोमोडेशन खात्याकडे पाठविण्यात आला होता. लोकसभा निवडणुका त्यावेळी तोंडावर असल्याने याबाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र आता मालमत्ता विभागाने कार्यालये रिकामी करण्याचा प्रस्ताव पुन्हा आणला आहे. नियम आणि अटीशर्थीनुसार सात वर्षांपूर्वीच काँग्रेसने ही सर्व कार्यालये रिकामी करावयास हवी होती. काँग्रेसला नव्या कार्यालयासाठी जून २०१० मध्ये ९-ए, राउज एवेन्यू ही जागा देण्यात आली होती. मात्र ही जागा घेण्यास काँग्रेस उत्सुक नसल्याचे सांगितले जाते.