‘अति घाई संकटात नेई'

Last Updated: Jul 18 2020 1:54AM
Responsive image

डॉ. राजेंद्र भस्मे


अखेर पुन्हा एकदा ठाणे-पुणे कुलूपबंद झालं. कोल्हापूरवरही पुन्हा कडक लॉकडाऊनची वेळ आली.. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे मिळते, फळे बघा आहेत का, धक्के देत ठाण्याचा जांभळी नाका व पुण्याची गुलटेकडी गजबजली जात असेल तर ‘कोरोना’ तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे.

लग्न करण्याची घाई, पोरं जन्माला घालण्याची घाई, त्या पोरांना शाळेत घालण्याची घाई, त्यांची करिअर करण्याची घाई, परदेशात धाडण्याची घाई, मोठ्या पॅकेजची घाई, प्रशस्त मोठ्ठं घर-कार खरेदीची घाई, बँक बॅलेन्स वाढविण्याची घाई. ही घाईची परंपरा थोडी तपासून पहा. अख्खी पिढी भरकटल्याचा प्रत्यय येईल.

पूर्वी विवाह लवकर व्हायचे. संतती 10 वर्षांनी झाली तरी हरकत नव्हती. आज? पूर्वी मुलं 5-6 वर्षे मैदानावर - नदी - डोहावर हुंदडायची मग शाळेत प्रवेश घ्यायची. आज? घर-कार मेहनत करून घेऊ. आज बँका दारात कर्जाची घाई. पूर्वी 80-90 नंतरच मरणाचा विचार. आता मरणाचीही घाई. 22-25 वर्षांची पोरं मोटरसायकल अपघातात मरतात तेव्हा मोटरसायकल घेऊन देणार्‍या मातापित्यांची किवच येते. घाई... घाई... आणि घाईच!

प्रगतीच्या नांवाखाली 60 दिवसांचे टॉमेटो 22 दिवसांत लाल होवून बाजारात येतात. 35 दिवसांची कोथिंबीर 20 दिवसांत जुडीत विसावते. सायन्सला घाई, खाणार्‍याला घाई अन् पिकविणार्‍यालाही घाईच. म्हणे प्रगती! एवढी घाई करून शेतकरी सुखी आहे? शास्त्रज्ञ भारतात न थांबता अमेरिकेत पळतात? मग एखादा कोरोना आला की पुन्हा गावाकडे का पळता? पळण्याचीही घाईच! 

सगळीकडे घाई. घाईतच वाचन व घाईतच सेवन आणि जेवणही. मित्रांनो, ही घाई आज का लिहिली? स्वतः थोडे बदला. आठ दिवस भाजी खाल्ली नाही. डाळ उकडून खाल्ली तर मरण येणार आहे का? घराबाहेर पडता? कोरोना संसर्गामुळे फैलावतो हे माहित असताना स्वतःसह इतरांचा जीव का धोक्यात घालता? व्यापारी वर्गालाही चाप देणं गरजेचं आहे. तंबाकूची पुडी 10 रुपये. मात्र तीच मागच्या दाराने 70 रु. विकतात. जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार. श्रीमंत होण्याची घाई. अखेर कोरोना पॉझिटिव्ह झाला. त्या व्यापार्‍याची बायको 18 दिवसात विधवा झाली. मरण्याचीही घाई!

कोरोनाचे पेशंट व त्यांचे अंत्यसंस्कार आपण टी. व्ही. च्या पडद्यावर पाहतो. कचरा फेकतो तसे मृतदेह फेकतात. श्वानाची विष्ठा गाडावी तसे प्रेत गाडतात. चिखल तुडवावा तशी शवागरात ही मेलेली माणसं ते वॉर्डबॉय तुडवितात. हे सगळं पाहता मग बदलत का नाही? ज्या बापाने आयुष्यभर कष्ट केलं, दोन वेळचं धड जेवला नाही. त्याचा कोरोनाने घात केला.

घरातूनच घाई!

अहो, ऐकलं का? भाजी आणा अहो, ऐकलं का? किराणा आणा, दुध आणा, फळे आणा, मांस-मटण आणा. ही आणण्याची घाई त्याच्या जीवावर बेतली. म. गांधी 42 दिवस उपाशी राहिल्याची नोंद इतिहासात आहे. गांधींचा देश आहे. 12 दिवस डाळरोटी खाऊन जगू शकत नाही?

मित्रांनो, मरणाची एवढी घाई करू नका.

2020 हे पैसे कमविण्याचे वर्ष नाही. हे वर्ष आहे स्वतःला जीवंत ठेवण्याचे. जो जीवंत राहिला तिच त्याची खरी प्रॉपर्टी. तेच त्यांचं कौटुंबिक विश्व. घराबाहेर पडू नका. वाचन करा, विनोद करा, नृत्य करा, संगीत ऐका. बायकोची छेड काढा, पुन्हा तिची मनधरणी करा, उत्तम चहा करायला सांगा. प्रेमाच्या चार गोष्टी करा. मित्रांना फोन लावा. जुन्या आठवणी ताज्या करा. घाई करू नका. प्लीज घराबाहेर पडू नका.