नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) वरून हिंसक आंदोलन सुरु आहे. या हिंसाचारातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. या प्रकरणी केंद्र सरकारला जबाबदार धरत विविध स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, हरियाणाच्या एका मंत्र्यांने दिल्ली हिंसाचारावर अजब प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे दिल्ली हिंसाचाराला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
हरियाणा सरकारचे मंत्री रणजीत चौटाला यांनी दिल्ली हिंसाचारावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, हिंसाचार हा होत राहणार. यापूर्वीही अशा घटना घडायच्या. ज्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या झाली त्यावेळी दिल्लीत हिंसाचार उफाळून आला होता. हिंसाचार हा एक जीवनाचा भाग असल्याचे चौटाला यांनी म्हटले.
तसेच, सरकार या प्रकरणात तातडीने कारवाई करत आहे आणि हे प्रकरण दिल्लीचे आहे, कायद्याचे आहे, त्यामुळे यावर अधिक बोलणे उचित ठरणार नसल्याचे चौटाला यावेळी म्हणाले.
रविवारपासून ईशान्य दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, या हिंसाचारामधील मृतांचा आकडा आता ३४वर पोहोचला आहे. यांपैकी दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. याप्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.