Tue, Jul 14, 2020 12:51होमपेज › National › राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राजधानीत कोरोनामुक्तीचा दर 'सरस'!

राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राजधानीत कोरोनामुक्तीचा दर 'सरस'!

Last Updated: Jun 30 2020 6:24PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीकरांसाठी शुभवर्तमान. राज्यात कोरोनामुक्तीचा दर सातत्याने सुधारत आहे. सोमवारी दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर ६६.०३ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. राष्ट्रीय सरासरी ५८.६७ टक्क्यांच्या तुलनेत हा दर ७.३६ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात कोरोनामुक्तीच्या दराने ४० वरून ६० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. 

प्राप्त आकडेवारीनूसार राजधानीत जून महिन्यात ६४ हजारांहून अधिक कोरोनाबा​धित आढळून आले. ​तर, ४७ हजार ३५७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दिल्लीचा कोरोनामुक्तीचा दर त्यामुळे हळू हळू वाढत आहे. १९ जूनला दिल्लीत कोरोनामुक्तीचा दर ४४.३७ टक्के नोंदवण्यात आला. पंरतु, २० जूनला हा दर वाढून ५५.१४ टक्क्यांवर पोहचला. कोरोनामुक्तीच्या दरात त्यानंतर सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यात दररोज सरासरी तीन हजार कोरोनाबाधित आढळून येत आहेत. पंरतु, कोरोनामुक्तीच्या दरात वाढ होत असल्याने रुग्णसंख्या कमी दिसून येत आहे. 

दिल्लीत २३ जूनला एका दिवसात सर्वाधित ३ हजार ९४७ कोरोनाबाधित आढळून आले होते. यावेळी कोरोनामुक्तीचा दर ५९.०२ टक्के नोंदवण्यात आला होता. पंरतु, २४ जूनला या दरात सौम्य घट झाली होती. हा दर गेल्या बुधवारी ५८.८६ टक्क्यांवर घसरला होता. २५ जूनला त्यात वाढ होवून तो ६०.६७ टक्के झाला. तेव्हा पासून आतापर्यंत हा दर ६० टक्क्यांहून अ​धिकचा आहे. २६ जून पर्यंत दिल्लीचा कोरोनामुक्तीचा दर ६०.९६ टक्के एवढा होता.

सध्या दिल्लीतील २६,२४६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. एकूण ८५ हजार १६१ कोरोनाग्रस्तांपैकी  ५६,२३५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, २,६८० रुग्णांचा  मृत्यू झाला. २९ जूनला दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर ६६.०३ टक्के नोंदवण्यात आला. १५ ते २९ जून दरम्यान जवळपास ४० हजार १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ७ हजार ७२५ कोरोनामुक्त रुग्णांना २० जूनला एकाच दिवशी विविध रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ५ जूनला कोरोनामुक्तीचा दर ४० टक्क्यांहून कमी होती. अवघ्या २५ दिवसांमध्येच कोरोनामुक्तीच्या दरात कमालीची वाढ दिसून आली आहे, हे विशेष.

राजधानी दिल्लीतील ​कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने दिल्लीचे सूत्रे हाती घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजधानीच्या स्थितीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. अधिका-यांसह राज्यातील मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतल्या. अशात राज्य सरकार, केंद्रीय गृहमंत्री तसेच नायब राज्यपाल यांदरम्यान आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले होते. कोरोनामुक्तीच्या वाढलेल्या दरावरूनही आता श्रेयवादाची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.