Mon, Aug 03, 2020 15:04होमपेज › National › निर्भयाच्या बलात्काऱ्यांना २२ जानेवारीला फाशी होणार नाही

निर्भयाच्या बलात्काऱ्यांना २२ जानेवारीला फाशी होणार नाही

Last Updated: Jan 15 2020 2:15PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार (निर्भया) प्रकरणातील चौघांची २२ जानेवारीला होणारी फाशी पुढे ढकलली आहे. ठरलेल्या दिवशी फाशी शक्य नसल्याचे दिल्ली सरकारने उच्च न्यायालयात माहिती दिली आहे. चौघा आरोपींमधील एकाने दया याचिका दाखल केली आहे. ती याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे प्रलंबित आहे.  

कैद्यांच्या नियमानुसार दया याचिका दाखल केली असेल, तर फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यापासून वाट पाहावी लागते, अशी माहिती दिल्ली सरकारने उच्च न्यायालया दिली. चौघा आरोपींना २०१३ मध्ये फाशीची शिक्षा झाली असून त्यांच्या  शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 

आरोपी मुकेश कुमारने दया याचिका दाखल केली होती. त्याने सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन फाशी वॉरंटला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. वकील वृंदा ग्रोव्हर यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी सत्र न्यायालयाने आदेश दिला होता. या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे तसेच राष्ट्रपतींकडे दया याचिका प्रलंबित असल्याने फाशीच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असे याचिकेत नमूद केले आहे.