Sat, May 30, 2020 02:06होमपेज › National › दिल्ली दंगलीच्या बळींची संख्या ३८ वर

दिल्ली दंगलीच्या बळींची संख्या ३८ वर

Last Updated: Feb 28 2020 2:18AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीत गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 38 लोक बळी पडले असून जखमींची संख्या दीडशेच्या वर गेली आहे. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 106 संशयितांना अटक केली आहे. याशिवाय 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत केली जात असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ईशान्य दिल्लीत रविवारी रात्रीपासून दंगलीला सुरुवात झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर असताना म्हणजे सोमवारी व मंगळवारी हिंसाचाराची तीव्रता सर्वात जास्त होती. गेल्या दोन दिवसांत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दंगलीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांचे हिंसाचारात नुकसान झाले असल्याचे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल; तर जखमी असलेल्यांवर मोफत उपचार केले जातील, असे सांगून केजरीवाल म्हणाले की, मृत अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमींना 25 हजार रुपये, नुकसानग्रस्त रिक्षासाठी 25 हजार रुपये, ई रिक्षासाठी 50 हजार रुपये दिले जाणार असून ज्यांचे घर वा दुकान जाळण्यात आले आहे, त्यांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्या लोकांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र जळाले आहे, त्यांना ही कागदपत्रे नव्याने काढता यावीत, यासाठी कॅम्प उघडले जातील.

दंगलग्रस्तांपर्यंत मोफत भोजन पोहोचविले जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. हेल्पलाइन नंबर जारी केले जात आहेत, असे सांगतानाच केजरीवाल यांनी शांतता समित्या सक्रिय केल्या जाणार असल्याचे नमूद केले. आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसेन याच्याबाबत विचारले असता केजरीवाल म्हणाले की, दंगलीचे राजकारण होऊ नये, असे आपले मत आहे. माझ्याजवळ पोलिस नाही, मी कशी काय कारवाई करू शकतो? ताहिर हुसेन असो वा अन्य कोणी, कडक कारवाई झाली पाहिजे. आम आदमी पक्षाचा कोणी नेता दोषी पकडला गेला तर त्याला दुप्पट शिक्षा करावी, अशी आपली भूमिका आहे.

सुरक्षा दलाचा फ्लॅग मार्च

हिंसाग्रस्त भागात सातत्याने पोलिस आणि सुरक्षा दलाकडून फ्लॅग मार्च काढला जात असून लोकांना शांततेचे आवाहन केले जात आहे. अटक करण्यात आलेले सर्व लोक स्थानिक असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही फूटेज तपासून आणखी संशयिताना अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हिंसाग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना चांदबाग विभागात लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

अमित शहांनी घेतला आढावा

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयात आजही दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून परिस्थितीचा आढावा घेतला. जोहरीपूर एक्स्टेंशन परिसरात एका नाल्यात दोन लोकांचे मृतदेह गुरुवारी सकाळी सापडले. हिंसेत बळी गेलेल्यांचे आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सध्या राज्यात हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील अनेक भागांत निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहांकडून सुरक्षा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. नुकतीच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल अनिल बैजल तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह सचिव अजय भल्ला तसेच आयबी प्रमुखासह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत त्यांनी स्थितीचा आढावा घेतला, हे विशेष.