Mon, Jan 18, 2021 09:52होमपेज › National › चिंता वाढवणारा कोरोनाग्रस्त भारत, २ दिवसांत २५ हजार नवे रुग्ण 

चिंता वाढवणारा कोरोनाग्रस्त भारत, २ दिवसांत २५ हजार नवे रुग्ण 

Last Updated: Jun 05 2020 3:12PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. त्याबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूतही झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जेव्हापासून सरकारने कोरोना बाधित रुग्णांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 1000 वर पोहोचायला 40 दिवस लागले होते. पण, आता हा वेग प्रचंड वाढला असून गेल्या 4 दिवसांतच 1000 लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

अशाच प्रकारे भारतात कोरोनाच्या पहिल्या 25 हजार रुग्णांची नोंद होण्यासाठी 87 दिवसांचा कालावधी लागला होता. पण, आता 25 हजार नवे रुग्ण होण्याचा वेग 2 दिवसांवर आला आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 770 वर पोहोचली आहे. 

प्रत्येक 25 हजार कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढीचा दर 

तारीख रुग्णांची संख्या लागलेला वेळ 
एप्रिल 26 26,496   87 दिवस   
मे 7 52, 952     11 दिवस 
मे 14  78, 003      7 दिवस 
मे  19  1,01, 139       5 दिवस 
मे 23  1,25,101     4 दिवस 
मे 27     1, 51, 767   4 दिवस
मे 31 1,82,143 4 दिवस 
जून 3 2,07,615      3 दिवस 
जून 5   2, 26, 770    2 दिवस 

भारतात 12 मार्चला पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 29 एप्रिलला 1 हजार मृत्यूंचा टप्पा पार झाला. तेव्हापासून भारतात कोरोना बाधितांच्या मृत्यूची आकडेवारी वेगाने वाढत आहे. काही आठवड्यातच भारतात 6 हजार 75 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. शेवटचे 1 हजार कोरोना मृत्यू हे फक्त 4 दिवसात झाले आहे. 

भारतातील प्रत्येक 1 हजार कोरोना मृत्यू आणि लागलेला वेळ 

तारीख     रुग्णांची संख्या लागलेला वेळ
12   मार्च पहिला मृत्यू      
29 एप्रिल 1,008 48 दिवस 
10  मे    2,109 11 दिवस
18 मे   3,029    8 दिवस 
25 मे   4,021     7 दिवस 
31 मे     5,164     6 दिवस 
4 जून  6,075    4 दिवस 

केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारांनी आता आर्थिक व्यवहार हळूहळू सुरु करण्याच्या संकेत देत लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, भारतातील कोरोना बाधितांच्या आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. 

केंद्र सरकारने गुरुवारी अनलॉक 1 च्या पार्श्वभूमीवर  शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, हॉटेल आणि धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे.